“तुकाराम… तुकाराम…" नामाच्या जयघोषात दुमदुमली देहूनगरी

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात तुकारामबीज दिनी लाखो भाविकांनी घेतले तुकोबारायांचे दर्शन

एमपीसी न्यूज –  जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 369 व्या बीजोत्सव सोहळ्यात राज्याभरातील सुमारे तीन लाख वैष्णव भाविक सहभागी झाले होते. उन्हाच्या चटक्यांची पर्वा न करता हा सोहळा पाहण्यासाठी आणि तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या काना-कोप-यातून भावीक आले होते.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आज पहाटे चार वाजल्यापासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहाटे चारच्या सुमारास काकडारती झाल्या नंतर येथील  मुख्य मंदिरातील पांडूरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे, विश्वस्थ अभिजित मोरे, अशोक दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे, जालिंदर महाराज मोरे व सरपंच सुनिता टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आली.

पहाटे सहा वाजता वैंकुठगमण मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा पंचायत समिती सदस्य हेमलता काळोखे व माजी सरपंच कांतीलाल काळोखे, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. रात्री पासूनच दर्शनासाठी भावीकांच्या रांगा लागल्या होत्या.  बीजोत्सव  सोहळ्यात सहभागी होण्यासाठी यात्रे पुर्वी दाखल झालेल्या दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापुजा, हरिपाठ  वीणा- टाळ -मृदंग यांच्या साथीत भजन किर्तनासह हरिनामाच्या जयघोषासह विठ्ठल नामाचा मंत्र जपण्यात सारे वैष्णव दंग झाले होते.

पहाटे महापूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. या नंतर दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांना रांगा लावल्या होत्या. सकाळी आठ वाजल्या पासून वैंकुठगमण मंदिराच्या परिसरात होणाऱ्या बीजोत्सावात सहभागी होण्यासाठी वैष्णवांची पाऊले उन्हाचा तडाख्याची तमा न बाळगता गोपाळपूऱ्याकडे पडत होती. सकाळ पासूनच मानाच्या दिंड्या मारूती मंदिरा पुढे अभंग आरती घेऊन पालखी मार्गाने मंदिरात प्रवेश करीत होत्या.

मंदिरातील सर्व विधीवत पूजा उरकल्या नंतर  सकाळी साडे दहाच्या सुमारास टाळकरी, सनई, चौघडे,  तुतारी शिंगवाले,ताशे,नगारे, आब्दागिरी, चौरा, गरूडटक्के, जरीपटके यांच्यासह मानकरी  कल्याणचे आप्पा महाराज लेले यांची दिडींचे चालक पद्माकर लेले यांच्या दिंडीसह  शाही लवाजम्यासमवेत पालखीचे मुख्यमंदिरातून वैकुठगमण मंदिराकडे प्रस्थान झाले.

पालखीपुढे अब्दागिरी महादेव वाघमारे, गरूडटक्के सुभाष सोनकट्टे, मानाचा जरीपटका ध्वज माणिक अवघडे व वैष्णवांची भगवी पताकेचा भार वाहम्याचे काम मारूती लांबकाने, श्रीराम खरात यांनी करीत आपली सेवा बजावली. पालखी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास  वैकुठगमण मंदिराच्या आवारातअसणा-या नांदुरकीच्या झाडाखाली आली. येथे महाराजांच्या वंशातील बापूमहाराज मोरे देहूकर यांचे सकाळी दहा ते बारा वाजे पर्यंत परंपरा व प्रथे प्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्याण प्रसंगावरील घोटवीन लाळ, ब्रम्हज्ञानी हाती । या अभंगावर किर्तन झाले. या अभंगाचे निरुपन करताना म्हणाले, की संत हे तरुणांच्या जीवनातील होकायंत्र असून जीवनाकडे पाहण्याची ज्याची जशी दृष्टी असेल तसे त्याला फळ मिळणार आहे.  किर्तन संपल्यावर दुपारी बारा वाजता बोला पुंडलिका वरदा हारी विठ्ठल,असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी येथील नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. उपस्थित भाविकांनी आपल्या महाराजांचे सदेह वैकुठगमण प्रंसगाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून श्री संत तुकाराम महाराजांना मनोभावे अभिवादन केले. यावेळी  हेवलीच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते महाआरती झाली.

नायब तहसिलदार संजय भोसले, मंडल अधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी आरती खरे, ग्रामसेवक गणेश वालकोळी, सरपंच टिळेकर  उपस्थित होत्या. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली आणि त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. हा बीजोत्यव सोहळा पार पडल्या नंतर येथील मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथेप्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले.

यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदी काठावर, मुख्य मंदिर, वैंकुठगमण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी गावात रस्तावर वाहने उभी केलेली आढळली नाहीत, गावाला जोडणारे दोन बाह्यवळण मार्गाचे काही अंशी काम मार्गी लागल्याने वाहने गावाच्या बाहेक उभी करून बाहेरच्या बाहेर सोडल्याने गावात गर्दी झाली नाही व वहातुक  कोंडी टळली. नदीला पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी होते. येथे भाविकांची गर्दी होवू नये म्हणून काही पोलीसांची नेमणूक करून सुचना सांगितल्या जात होत्या. दुपारी यात्रा संपल्यानंतर मात्र नागरिकांनी बाहेर पडण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे काही काळ रस्त्यात येणा-यांची व जाणारांची एकच गर्दी झाली होती.

आळंदी- देहू, निगडी -तळवडे देहू ,देहूरोड ते देहूगाव, तळेगाव चाकण बाजुने वाहनांची पार्किंगची व्यवस्था केल्याने या मार्गांवर गर्दी होऊनही वाहतूककोंडी झाली नाही. दुपारी तीन वाजल्यानंतर मात्र सर्व वहातूक सुरळीत झाली. सर्व खाजगी वहानांसाठी विठ्ठलनगर येथील जकातनाक्या जवळ थांबविण्यात आलेहोते मात्र देहूरोड कडील रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सीओडी डेपोजवळ सर्व वहाने अडविण्यात आली होती. पीएमपीएमएलच्या बसेससाठी माळीनगरला संत तुकाराम मंगल कार्यालयाच्या बाजुला तात्पुरते वहानतळ उभारले होते. याठिकाणाहून पुणे स्टेशन, शिवाजीनगर, मनपाभवन, आळंदी व देहूरोड स्टेशनला जादा बस सोडण्यात येत होत्या.तर एस.टी.साठी आळंदी रस्त्यावर जकात नाक्याजवळ तात्पुरते स्थानक उभे करण्यात आले होते.

जीवन प्राधिकरणच्या वतीने भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलीहोती. जागोजागी नळकोंडाळी बसविण्यात आली होती. या शिवाय गावातील स्वयंसेवी संस्थानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सिध्दी विनायक तरूण मंडळाने, पिंपरीचिंचवड महानगर पालिकेने भाविकांना शरबत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने खाजगी व शासकीय टॅंकर द्वारे पाणी पुरविले गेले. यामुळे भाविकांची तहाण भागविली गेली. आरोग्य विभागाच्या वतीने तीन ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली होती. त्याचा ही लाभ अनेक भाविकांनी घेतला. पोलीस बंदोबस्त चोख- यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार होवू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यात्रेवर नियंत्रण उपविभागीय अधिकारी मुजावर, देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरूण मोरे मार्गदर्शना खाली पोलीस बंदोबस्त काम करीत होता. त्यांना  मदत करण्यासाठी आपात्कालीन व्यवस्थापन अनिरूध्द अॅकॅडमीचे सुमारे 70 स्वयंसेवक, स्वकामसेवा मंडळाचे काही कार्यकर्ते मदतीसाठी आले होते.

यातील स्वकाम सेवा मंडळ व विश्व सामाजिक सेवा मंडळाचे कार्यकर्ते सेवा कार्य करण्यापेक्षा पुढे जाऊन दर्शन मिळते व सोहळा पाहण्यास मिळतो यासाठी  सहभाग घेतल्याचे जाणवत होते.

तुकारामबिज निमित्त वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट आणि प्राधिकरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने गाथामंदीर देहु येथे वारक-यांसाठी मोफत तपासणी करण्यात आली.  या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमय्या व श्रीराम नलावडे उपस्थित होते.

"dehu"
"dehu
"dehu
"dehu
"cmp"
"Photo"
"Photo
"Tukaram
"Tukaram
"Tukaram
"Tukaram

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.