मला मिळालेली संधी म्हणजे समाविष्ट गावांचा सन्मान – महापौर काळजे

एमपीसी न्यूज –  समाविष्ट गावांना आतापर्यंत नेहमीच सापत्नीक वागणूक दिली जात होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाची मला मिळालेली संधी म्हणजे समाविष्ट गावांचा सन्मान आहे, अशी भावना  पिंपरी-चिंचवडच्या महापौर पदाची धुरा हाती घेतल्यानंतर नितीन काळजे यांनी व्यक्त केली.

महापौरांनी आयेजीत केलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचा अजेंडा जाहीर केला. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे तसेच भाजपाचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना काळजे म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून समाविष्ट गावांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले. या गावांना कायम सापत्न वागणूक मिळाली. मात्र आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीत समाविष्ट गावांना न्याय मिळवून देणार असा शब्द दिला होता. त्यावेळी च-होली, मोशी, दिघी, चिखली आणि तळवडे आदी परिसरातील नागरिकांनी आमदार लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला तो शब्द त्यांनी खरा करून दखवला. त्यामुळे आज मला महापौर पदाची मिळालेली संधी म्हणजे समाविष्ट गावांचा सन्मान आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या ऐतिहासिक परिवर्तनात या शहराचा भाजपचा पहिला महापौर होण्याचा सन्मान मला मिळाला.

समाविष्ट गावात आजही अनेक सुविधांची वानवा आहे. रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पाणी समस्या निकालात काढण्यासाठी मी आग्रही भूमिका घेणार आहे.  शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या शहराचा परिपूर्ण विकास करण्याची ग्वाही देतो, असे आभार व्यक्त करणारे भाषण त्यांनी केले.

तसेच त्यांच्या कारकिर्दीत कोणती कामे करणार याचा अजेंडाही यावेळी  सादर केला ज्यामध्ये शास्ती कर माफ करणे, ज्यांनी भरली आहे त्यांची शास्ती पुढील बिलात समाविष्ट करणे, शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळवून देणे तसेच स्वतंत्र  पोलीस आयुक्तालयासाठी  प्रयत्न करणार, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी भामा आसखेडवरुन पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार, मेट्रो निगडीपर्यंत यावी यासाठी प्रयत्न करणार, च-होली, मोशी कचरा डेपोसाठी उपाययोजना करणार, कत्तलखाना प्रश्न मार्गी लावणार, सारथी अधिक प्रभावशाली करणार, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणार अशी आश्वासने त्यांनी महापौर कार्यक्रम पत्रिकेतून जाहीर केली.

भ्रष्टाचाराचे पाणी कुठे मुरते ते शोधणार

महापालिकेत जे भ्रष्टाचार झाले आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाईल. या भ्रष्टाचाराचे पाणी नेमके कुठे मुरते आहे याचा शोध मी लावणार आहे. तसेच  भाजपाच्या काळात पूर्णपणे पारदर्शी कामकाज केले जाईल. मी पैसा खाणार नाही खाऊ देणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.