Loksabha Election : कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून  करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Loksabha Election) यांनी सांगितले.

 

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आठवले पुण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरपीआय आठवले गटाचे सचिव संघटक परशुराम वाडेकर, सचिव बाळासाहेब जानराव, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, मंदार जोशी, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

इंडि आघाडीकडून संविधान बदलाची उलटसुलट चर्चा केली जात आहे. लोकशाही धोक्यात आली आहे असा प्रचार सुरु आहे. लोकशाही जर धोक्यात आली असती तर पंतप्रधान मोदी मत मागण्यासाठी देशभर फिरले असते का? संविधानावर देश चालणार आहे. विरोधकांनी कितीही खोटे बोलले तरी संविधानाप्रमाणेच देशाला चालवावे लागेल. देश म्हटला की,संविधानाची भूमिका, गीता, कुराण, बायबल असे अनेक धर्माचे ग्रंथ आहेत आणि याचा सर्वांना आदर आहे. संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे चालण्याची परवानगी दिली(Loksabha Election) आहे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

 

 

सध्या देशात भाजपप्रणित एनडीएचे वातावरण आहे. त्यामुळे चारशेपेक्षा जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे. राज्य आणि देशभरातील मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एससी,एसटी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका मांडली जात आहे.त्यामुळे आम्हाला विश्‍वास आहे की, आमच्या महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्री करतो अशी ऑफर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र त्यांना अगोदर मुख्यमंत्री केले असते तर ही वेळ आली नसती. आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न ठाकरेंचा होता. महाराष्ट्राच्या विकासाचा आणि राजकारणाचा खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडीचा आम्हाला खात्मा करायचा असून पुण्यातील चार आणि मुंबईच्या सर्व सहा जागा निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्‍वास आहे असेही आठवले म्हणाले.

 

मोहोळ यांच्या रॅलीत रामदास आठवलेंचा सहभाग 

 

मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता आहे. कोरोनानंतर त्यांनी विकासकामांना गती दिली. त्याबरोबर शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. पुणे महापालिकेतील शिवाजी महाराजांचे स्मारक, महापालिकेत पहिल्यांदा स्थापन केलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा, माता रमाईचे स्मारक, फुले दांपत्याची समता भूमी, लहुजी वस्ताद साळवे यांचे समाधी स्मारक ही काही उदाहरणे आहेत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता अशी मोहोळ यांची प्रतिमा आहे, पुणेकरांनी त्यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

 

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेल्या प्रचार फेरीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहभाग घेतला. आमदार सुनील भाऊ कांबळे, मंगला मंत्री, उमेश गायकवाड, हिमाली कांबळे, सुशांत निगडे,  संदीप लडकत, सनी मेमाणे,  जयप्रकाश पुरोहित आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.