Pune : नृत्यसाधकांनी पूरक विज्ञानमितीही शोधाव्यात; ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – कला, विज्ञान आणि अध्यात्म या ज्ञानशाखा परस्पर पूरक ठरू शकतात का  नृत्यकला आणि वैज्ञानिक तथ्ये तसेच आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, यांचा मेळ घालून कला साधनेला आणि सादरीकरणाला एक नवी मिती देता येईल का,याचा विचार नृत्यसाधकांनी गांभीर्याने करावा, असे आवाहन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. ‘सतत प्रयोग, चिंतन, वैचारिक देवाणघेवाण आणि ज्ञानाची पुनरावृत्ती, ही काही साम्य स्थळे विचारात घेऊन कलाकारांनी कला आणि विज्ञानाचे नवे आयाम शोधावेत, असेही ते म्हणाले.

 

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था अर्थात एसएनएसएस यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिजात नृत्यकलेला समर्पित असलेल्या अटेंडन्स (AttenDance) या नृत्य वार्षिकांकाचा रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन डॉ. भटकर यांच्या उपस्थितीत(Pune) संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

शुभी प्रकाशन संस्था प्रकाशित हा नृत्य वार्षिकांक पुण्याच्या नृत्य व कलासाधकांना समर्पित करण्यात आला असून सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात नुकतेच याचे प्रकाशन संपन्न झाले. अंकाचे संपादक, कलासमीक्षक आशिष मोहन खोकर, वार्षिकांकाच्या अतिथी संपादिका, पुण्यातील कथक नृत्य कलाकार आणि लाऊड अपलॉज या नृत्यावर आधारित मासिकाच्या संपादिका नेहा मुथियान, भरतनाट्यम गुरु डॉ सुचेता भिडे चापेकर, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कथक गुरु शमा भाटे, कथक गुरु मनीषा साठे, प्रकाशक संजय आर्य, सुचिता दाते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

डॉ. भटकर यांनी मोजक्या शब्दांत विज्ञान, कला आणि अध्यात्म यांचे अनुबंध उलगडले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “नृत्यामधील विज्ञान आणि कलापूरक वैज्ञानिक साधनांचा उपयोग नृत्य कलाकारांनी काही प्रमाणात अंगिकारला आहे. आपण सर्वजण जो मोबाईल सहज वापरतो, त्या साधनाच्या निर्मितीमागे अनेक वैज्ञानिक तथ्ये आहेत. अनेक प्रकारचे विज्ञान, तत्त्वे, समीकरणे या छोट्या साधनांत सामावली आहेत. आता काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. त्यामुळे येत्या काळात रोबोनृत्याचीही शक्यता आहे. नृत्य कलाकारांनी काळाचे हे बदल स्वीकारत विज्ञानाची योग्य ती साथ घेत कलेचे क्षेत्र समृद्ध करावे.”

 

आशिष खोकर यांनी अटेंडन्स या नृत्यसमर्पित वार्षिकांकाचे अंतरंग तसेच त्यामागील हेतू विशद केला. ते पुढे म्हणाले की, “रौप्यमहोत्सवी अंक पुण्यातील नृत्यसाधकांना समर्पित करता आला, याचा विशेष आनंद वाटतो. कारण, जगातील प्रत्येक ज्ञानशाखेतील उच्चतम तज्ज्ञता, हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. नव्या काळाची आव्हाने स्वीकारताना कलेचे क्षेत्रच उत्तम मार्ग(Pune) दाखवेल.”

वार्षिकांकाच्या मार्गदर्शक व ज्येष्ठ नृत्यगुरू शमा भाटे म्हणाल्या, “जिथे नृत्याची परंपराच नव्हती, अशा शहरात नृत्य रुजवून, सर्व प्रकारचा संघर्ष करत इथे नृत्यानुकूल वातावरण निर्माण करण्यात ज्यांचे योगदान आहे, त्या गुरू रोहिणी भाटे यांच्या स्मृतींना हा अंक समर्पित केला आहे. या अंकातील समृद्ध आशय पुण्याचे नृत्यक्षेत्रातील स्थान राज्याबाहेरील रसिकांपर्यंत नेईल, याचा आनंद वाटतो.”

 

Pimpri:  मराठी रसिकांचेच मराठी चित्रपटावर प्रेम कमी – मृणाल कुलकर्णी

 

नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे म्हणाल्या, “पुण्याच्या नृत्य इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा आहे. नृत्य ही अनेक कलांना सामावून घेणारी कला आहे. या निमित्ताने पुण्यातील नृत्याचे योगदान सर्वदूर पोचणार आहे याचा आनंद आहे.” रौप्यमहोत्सवी वर्षांत हा मान पुण्याला मिळाला, याचा विशेष आनंद वाटतो, अशा भावना गुरू मनीषा साठे यांनी व्यक्त केल्या.अतिथी संपादक नेहा मुथियान यांनी मनोगत मांडताना अंकाच्या निर्मितीची माहिती दिली. पुण्यातील नृत्यसाधना राष्ट्रीय पातळीवर पोहोचणे आवश्यक वाटल्याने हे काम स्वीकारले, असे त्या म्हणाल्या.उत्तरार्धात अरुंधती पटवर्धन, रसिका गुमास्ते, प्राजक्ता अत्रे, लीना केतकर आणि मंजिरी कारुळकर या नृत्यांगनांनी शिष्यांसह ‘ऋतूभेदम्’ हा कार्यक्रम सादर केला. नृपा सोमण यांनी सूत्रसंचालन केले तर अरुंधती पटवर्धन यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.