महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य करावे – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती द्यावी आणि या कर्जमुक्तीसाठी व शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला आर्थिक सहाय्यता करावी त्याचबरोबर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारने केली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी काल चर्चे दरम्यान लोकसभेत केली.

लोकसभेचे बजेटकालीन सत्र चालू असून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वार्षिक बजेटवरती चर्चा करताना शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांनी देशभरातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी चालू आहे. यातच केंद्रीय कृषी मंत्री व भारत सरकारचे लक्ष वेधून घेऊन काल कृषी बजेटवर चर्चा करताना खासदार बारणे यांनी सविस्तर विवेचन केले.

खासदार बारणे म्हणाले की, भारताकडे कृषी प्रधान देश म्हणून पहिले जाते आणि देशातील 60 ते 70 टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असून सध्या शेती व्यवसाय हा घाट्याचा व्यवसाय ठरत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी पिकासाठी लावलेले पैसे देखील शेतीच्या उत्पन्नातून निघत नाहीत. बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीव्यवसायावर मोठ्या प्रमाणावर झाला असून अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ यामुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील शेतक-याला कर्जमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.