प्रत्येकाने रक्ताशी नाते जोडायला हवे – राम बांगड

सर्वाधिक वेळा रक्तदान करणा-यांना जीवनदान पुरस्कार प्रदान


एमपीसी न्यूज –  दरवर्षी पुण्यामध्ये दोन लाख रक्ताच्या पिशव्यांची आवश्यकता असते. परंतु दरवर्षी जेमतेम सत्तर हजार पिशव्या विविध रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून संकलित होतात. लग्नाचे वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम आणि परीक्षेत यश मिळाल्यास त्याचा आनंदोत्सव आपण रक्तदान करुन करायला हवा. उन्हाळ्यात रक्ताची गरज मोठया प्रमाणात भासते. पुण्याजवळील सासवड, भोर किंवा अगदी नगर पर्यंत रक्तपेढयांची पुरेशी सोय नाही. त्यामुळे गरज लागल्यास पुरेशा प्रमाणात रुग्णांना रक्त पुरविण्यासाठी प्रत्येकाने रक्ताशी नाते जोडत विविध माध्यमांतून रक्तदान करीत इतरांना देखील प्रवृत्त करायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड यांनी व्यक्त केले.


झंवर परिवारातर्फे रामेश्वर झंवर आणि पुष्पाबाई झंवर यांच्या स्मरणार्थ शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू कार्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुण्यामधील सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल रमेशचंद्र पाटणकर, आयोजक शाम झंवर, कैलास झंवर, गणेश झंवर आदी उपस्थित होते. राम बांगड, सदाशिव कुंदेन, सारंग यादवाडकर, भाई प्रधान, गोपाळ  लोहिया, चिंतामणी पळसुले यांना सर्वाधिक वेळा रक्तदान केल्याबद्दल जीवनदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे.
राम बांगड म्हणाले, कुटुंबाकडे स्वत:पेक्षा जास्त लक्ष असल्याने देशातील १५ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्या रक्तदान करु शकत नाही. स्त्रियांनी ही उणीव दूर करण्याकरीता शिळे अन्न खाणे टाळत वेळेवर जेवावे. तसेच पालेभाज्या फळे, राजगिरा गुडदाणी, खजूर असे पदार्थ हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढवू शकतील.  


कैलास झंवर म्हणाले, रक्त तयार करण्यासाठी कोणतीही फॅक्टरी किंवा कंपनी काम करु शकत नाही. रक्ताची निर्मीती इतरत्र कोठेही करता येत नाही. त्यामुळे रक्तदात्यांना प्रोत्साहित करुन रक्तदानास उद्युक्त करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. शाम झंवर म्हणाले, रक्तदान शिबीराप्रमाणेच आम्ही अनेक उपक्रम राबवितो. माहेश्वरी समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्या व्यक्तिबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता शाल अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे अनेकजण शाल अर्पण करतात. परंतु कैलास झंवर यांनी या शाली एकत्र करुन समाजातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. मागील ९ वर्षांपासून सुमारे ४ हजार शाली गरजूंपर्यंत पोहोचविल्या आहेत. कोठेही निधन झाले, तर कैलास झंवर येथे जातात आणि शाली देण्याचे आवाहन करतात. यामुळे हजारो गरजूंना शाली मिळाल्या आहेत. यावर्षी वंचित विकास संस्थेला शाली देण्यात आल्या.


रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब आॅफ खडकी, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा युवा समिती, अलायन्स क्लब आॅफ पूना, श्री बालाजी भजनी मंडळ, राधाकृष्ण मंदिर युवा समिती या संस्थांचा उपक्रमात सक्रिय सहभाग होता. सन्मान सोहळ्यापूर्वी संचेती हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ.अपूर्व शिंपी यांचे गडघेदुखी व कमरेची काळजी याविषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच नेत्रदान जनजागृतीचे व नेत्रदान अर्ज भरणे हा उपक्रम अलायन्स क्लब आॅफ पूनातर्फे राबविण्यात आला. रुबी हॉल क्लिनीक, पूना ब्लड बँक, पीएसआय रक्तपेढी आणि पूना हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबीरात २८२ जणांनी रक्तदान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.