पिंपरीचे महापौर व स्थायी समिती अध्यक्षांमध्ये जोरदार खडाजंगी!


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सभाशास्त्र आणि महापौरांची नवीन मोटार खरेदी या विषयावरुन ‘वाद’ विकोपाला गेल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि.20) पार पडली. महापौर नितीन काळजे यांच्यासह पदाधिकारी आपल्या कार्यालयात गेले. त्यानंतर सभाशास्त्र आणि महापौरांच्या नवीन मोटार खरेदीवरुन महापौर काळजे आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती, अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पिंपरी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर संख्याबळानुसार 13 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य निवडीवरुन सकाळपासूनच भाजपमध्ये खदखद सुरु होती. भोसरीतील नगरसेविका प्रियंका बारसे यांची समितीवर नियुक्ती करण्यास एका गटाने विरोध केला होता, असे सूत्रांनी सांगितले.

परंतु, दुस-या गटाने बारसे यांचे नाव लावून धरत त्यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर वर्णी लावली. त्यामुळे भाजपचा एक गट कमालीचा नाराज झाला होता. त्यातून आणि महापौरांच्या नवीन मोटार खरेदीवरुनच महापौर काळजे आणि स्थायी समिती अध्यक्षा सावळे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेतील भाजप पदाधिका-यांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाल्याची स्थिती आहे. महापौर काळजे आणि सभागृह नेते एकनाथ पवार हे दोघे एकत्र तर स्थायी समिती अध्यक्ष सावळे स्वतंत्र कामकाज करत असल्याचे पालिकेत चित्र आहे. कचरा विलिनीकरण मोहिमेच्या पत्रकार परिषदेला कार्यालयात असतानाही सावळे यांनी येणे टाळले होते. त्यावेळी निमंत्रण न दिल्याच कारण पुढे करत सभागृह नेत्यांनी अधिका-यांनाच फैलावर घेतले होते.

पिंपरी पालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपले कट्टर समर्थक नितीन काळजे यांनी महापौरपदी विराजमान केले. महापौर निवडीवरुन भाजपमध्ये संघर्ष उफळा होता. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांची स्थायी समिती अध्यक्षपदी वर्णी लागली. स्थायी समिती अध्यक्ष निवडीवेळी आमदार महेश लांडगे यांनी शहरात असूनही त्याकडे पाठ फिरवली होती. तेव्हापासून त्यांच्यात संघर्ष असल्याची चर्चा आहे.

याबाबत महापौर नितीन काळजे यांच्याशी संपर्क साधला असता असेही काहीही झाले नसल्याचे सांगत त्यांनी सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला. तर, सीमा सावळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.