पीएमपीच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांना पुन्हा पालिका सेवेत घेणार; महासभेचा निर्णय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने हस्तांतरित केलेल्या 178 कर्मचार्‍यांना पीएमपीमध्ये अधिक काम दिले जात असून, त्यांचा छळ केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील कर्मचा-यांवर पीएमपीएलमध्ये अन्याय केला जात आहे. तसेच महापालिकेत मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याने, त्यांना पुन्हा महापालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत उपसूचनेसह मंजूर करण्यात आला.

पिंपरी पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 20) झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पीएमपीचे कर्मचारी असलेले मात्र महापालिकेत सेवा करणार्‍या 178 जणांना पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या मागणीवरून एप्रिल 2017 मध्ये पुन्हा पीएमपीकडे हस्तांतरित केले गेले होते. या कर्मचा-यांनी महापालिकेतच काम करुन देण्याची मागणी केली होती. तसेच पालिकेतील पदाधिका-यांनीही कर्मचारी पालिकेच राहावेत, यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, मुंढे राजकीय दबावपुढे झुकले नाहीत. कर्मचारी पीएमपीएलमध्ये रुजू झाले नाहीत तर, निलंबन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर कर्मचारी पीएमपीएमलमध्ये रुजू झाले होते.

पिंपरी-चिंचवडमधील कर्मचा-यांना पुण्यातील कर्मचार्‍यांपेक्षा अतिरिक्त काम दिले जाते. त्यांना दूर अंतरावरील हडपसर, स्वारगेट डेपोत काम दिले गेले आहे. त्यामुळे निगडी आणि चर्‍होली येथील कर्मचार्‍यांना भल्या पहाटे दूर अंतरावरील डेपोत बायोमेट्रिक थम्ब करण्यासाठी जावे लागत आहे. शहरातील कर्मचार्‍यांवर होणारा हा अन्याय दूर करावा किंवा त्यांना स्वेच्छानिवृत्ती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केली. या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आयुक्तांनी त्यावर खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र आयुक्त त्यावर काही बोलले नाहीत.

पीएमपीकडून पिंपरी-चिंचवडच्या कर्मचार्‍यांबाबत भेदभाव केला जात असून, त्यांना पुन्हा महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली. दरम्यान, कर्मचार्‍यांबाबत पूर्ण सहानुभूती असून, त्यांच्या पालिका सेवेत सामावून घेण्याचा निर्णय पालकत्वाच्या भावनेतून घेतला जात असल्याचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.