शहरातील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे; महापौर काळजे यांच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ठिकाणचा कचरा रोजच्या रोज उचलला जाण्यासाठीची यंत्रणा आरोग्य विभागाने सक्षम करावी. शहरातील कचरा रोजच्या रोज उचलण्याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयाने तातडीने उपाय योजना कराव्यात, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, विजय खोराटे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, स्वाती चिंचवडे, सहाय्यक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, के.डी.दरवडे, उपअभियंता सी.एन धानोरकर, एस.एन.वाघ, एन.पी पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत आरोग्य ब प्रभागतील – कचरा गोळा करणे व त्याची वाहतुक करणे या प्रक्रियेची माहितीसह रोज किती टन कचरा गोळा केला जातो व त्याची विल्हेवाट कशी लावली जाते. तसेच निविदा प्रक्रियाची स्थिती या विषयासह आरोग्य विभागातील इतर कामकाजाबाबतही चर्चा झाली.

पिंपरी भाजी मंडई येथे मोठ्या प्रमाणात साठलेल्या कच-याची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच शहरातील सर्व ठिकाणचा कचरा रोजच्या रोज उचलला जाण्यासाठीची यंत्रणा आरोग्य विभागाने सक्षम करावी, अशा सूचना यावेळी महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.