Pune : पुण्यातील विसर्जन मिरवणूक चालली 28 तास 5 मिनिटे !


मागील वर्षीच्या तुलनेत 25 मिनिटे कमी

एमपीसी न्यूज – राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा मंगळवारी मोठ्या दिमाखात पार पडला. पुण्याच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या ढोलताशांच्या गजरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकांनी शहरातील रस्ते नेहमीप्रमाणे गजबजून गेले होते. तब्बल 28 तास पाच मिनिटे चाललेल्या या मिरवणुकीत अनेक कलाकारांना सादरीकरणाची संधी मिळाली. तर डॉल्बीवर तरुणाईने धरलेला ठेका बुधवारी दुपारपर्यंत त्याच उत्साहात होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विसर्जन मिरवणूक 25 मिनिटे लवकर संपली आहे. या मिरवणुकीत एकूण ३०८७ गणेश मंडळे सहभागी झाली होती.
यंदा पुण्यात गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त जोरदार तयारी करण्‍यात आली होती.  पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी मानाच्या पाचही गणपतींची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीला ठीक ९ वाजता सुरुवात झाली. ढोल-ताशा पथकांचे शिस्तबद्ध वंदन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक लाखो लोकांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणूक पाहण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर गर्दीचा महापूर उसळला होता.


पारंपरिक ढोलताशांच्या कडकडाटांबरोबरच डीजेचाही दणदणाट पाहायला मिळाला. विविध प्रकारचे देखावे, विद्युत रोषणाई केलेले, फुलांची आकर्षक सजावट केलेले रथ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. परदेशी पर्यटक देखील या मिरवणुकीची क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आतुर झालेले होते. सतोमी हिसानो ही जपानी तरुणी गळ्यात ठुशी, नऊवारी साडी असा मराठमोळा साज घालून तांबडी जोगेश्वरी मंडळात सहभागी झाली होती.

ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने मानाच्या पहिल्या असलेल्या कसबा गणपतीचे संध्याकाळी चार वाजून एक मिनिटांनी नटेश्वर घाट येथे हौदामध्ये विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन संध्याकाळी पाच वाजून 32 मिनिटांनी नटेश्वर घाटावर करण्यात आले. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे संध्याकाळी सहा वाजून 11 मिनिटांनी नटेश्वर घाट येथे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या पाचव्या मानाच्या तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी पांचळेश्वर घाट येथे तर शेवटच्या केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सात वाजून 28 मिनिटांनी पांचळेश्वर घाट येथे करण्यात आले. महत्वाच्या गणेश मंडळांपैकी भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन पहाटे साडेपाच वाजता नटेश्वर घाट येथे करण्यात आले. तर अखिल मंडई गणपतीचे विसर्जन सकाळी पावणेसात वाजता पांचळेश्वर घाट येथे करण्यात आले. 

मानाच्या गणपतीनंतर समस्त पुणेकरांना प्रतीक्षा असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते बेलबाग चौकात गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी स्वतः धुम्रवर्ण रथाचे सारथ्य केले. आकर्षक अशा धूम्रवर्ण रथापुढे मंडळाचा नगारा.. त्यापाठोपाठ प्रभात बँडचे पथक.. स्वरूप ढोल ताशा पथक..आणि मोरया मोरयाच्या गजरात विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकत होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…आणि मोरया मोरया या जयघोषाने टिळक चौक दुमदुमून गेला.. महापौरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी टिळक चौकातून पुढे मार्गस्थ झाला आणि साडेसात वाजता आरती झाल्यानंतर त्याचे विसर्जन झाले.

 
रात्रभर मिरवणुकीत सहभागी होऊन सुद्धा सकाळी मंडळांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झालेला नव्हता. अनेक मंडळाचे विसर्जन अद्याप बाकी होते. अखेर दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालीम तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या गणपतीचे  नटेश्वर घाटावर विसर्जन झाल्यानंतर 28 तास पाच मिनिटे चाललेल्या या मिरवणुकीची सांगता झाली. 

मागील सात वर्षामधील विसर्जन मिरवणुकीच्या वेळा –

2010 – 27 तास 25 मिनिटे

2011 – 27 तास 20 मिनिटे

2012 – 28 तास 50 मिनिटे

2013 – 27 तास 25 मिनिटे

2014 – 29 तास 12 मिनिटे

2015 – 28 तास 55 मिनिटे

2016 – 28 तास 30 मिनिटे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.