पुण्यातील ‘स्पेक्ट्रम मॅरेथॉन रन – 2017’ स्पर्धेत 200 पेक्षा जास्त विशेष मुलांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पुण्यातील स्पेक्ट्रम या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नुकतेच ‘स्पेक्ट्रम मॅरेथॉन रन – 2017’ या खास विशेष मुलांसाठीच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये पुणे वूमन्स काऊंसिल स्कूल, अयोध्या ट्रस्ट, बाणेर येथील विध्यांचल स्कूल आणि आश्रयाच्या 200 हून अधिक विशेष विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.

पुण्याचे स्पोर्ट्स आयडॉल म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध खेळाडू अर्नवाज दमानिया आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जयाफिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात झाली. झुंबा या व्यायामप्रकाराने या मॅरेथॉनला सुरुवात झाली. अनुक्रमे 1.5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा दोन विभागात वयोमानानुसार ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. याशिवाय सीमेवर लढता लढता विकलांग झालेल्या सैनिकांची या मॅरेथॉनमधील उपस्थिती या विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा देणारी ठरली. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा हेगडे याही यावेळी उपस्थित होत्या.

महिलांचा सर्वांगीण, व्यक्तीमत्व आणि सामाजिक विकास व्हावा या उद्देशाने 25 वर्षांपूर्वी ‘स्पेक्ट्रम’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. निर्मला अगरवाल, कुसुम मित्तल आणि सबिना संघवी यांच्या पुढाकाराने संस्थेची स्थापना झाल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून अनेकविध कार्यशाळा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली यांचे आयोजन करण्यात येते.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.