Pune : कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी पीएमपीएलचे पालिकेला साकडे

एमपीसी न्यूज- यंदाच्या दिवाळीत पीएमपीएल कर्मचा-यांना वेळेत बोनस मिळण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडील थकीत 33 कोटी रुपयांची मागणी पीएमपीएल प्रशासनाने केली आहे. या रकमेतून कर्मचाऱ्यांचा बोनस अदा करण्यात येणार आहे, परंतु गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बक्षिसांची रक्कम अदा करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे.

मागील वर्षी पीएमपीएलचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देऊन बोनस देण्यास नकार दिला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना औद्योगिक न्यायालयाने दिलासा दिला. सर्व कर्मचा-यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान व 12 हजार रुपये बक्षीस देण्याचा आदेश दिला. दिवाळी जवळ येऊन ठेपल्याने इंटकने प्रशासनाकडे दस-याला बोनस देण्याची आणि गेल्या वर्षांच्या करारानुसार यंदा 13 हजार रुपये बक्षिसाच्या रकमेची मागणी केली आहे.

त्यावर पीएमपीएल प्रशासनाकडून पावले उचलली गेली आहेत. दोन्ही पालिकांकडे पास पोटीच्या थकीत रकमेची मागणी केली आहे. मात्र, आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत मागच्या वर्षाच्या इतके बक्षीस देणे शक्य नसल्याचे सांगितले. बक्षिसांची रक्कम न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा इंटकचे उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.