Talegaon Dabhade : कामाचे पैसे मागण्यासाठी आलेल्या मोलकरणीचा चाकूने वार करून खून

जखमी मोलकरणीचा उपचारादरम्यान मृत्यू, मालक अटकेत

एमपीसी न्यूज – कामाचे पैसे मागण्यासाठी आलेल्या मोलकरणीला चाकूने भोकसून गंभीर जखमी केले. मोलकरणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) चांभारवाडा तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी मालकाला अटक करण्यात आली आहे.

सुधीर तिलक भगवाने (वय 51, रा. चांभारवाडा, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रामदास पांडुरंग भोसले (वय 51, रा. चांभारवाडा, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली. शारदा राजू जाधव (वय 40, रा. कामशेत, ता. मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा जाधव आरोपी सुधीर याच्या घरी धुणीभांड्याचे काम करत होत्या. मंगळवारी त्या सुधीर याच्या घरी कामाचे पैसे मागण्यासाठी गेल्या. त्यावेळी सुधीर याने शारदा यांच्यावर चाकूने वार केले. तसेच त्यांच्या छातीमध्ये चाकूने भोसकले. यामध्ये शारदा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत आरोपी सुधीर याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.