Wakad : रहाटणी येथील सराफी व्यापाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून दुकानातून 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो सोने पाच जणांनी मिळून चोरून नेले. यामध्ये व्यावसायिकाच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास शिवराज नगर रहाटणी येथे घडली.

दिव्यांग प्रदीप मेहता (वय 24, रा. रहाटणी) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी शिवराज नगर येथील पार्क रॉयल सोसायटी समोर पुणेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. दुपारी एकच्या सुमारास तिघेजण दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतल्या बाजूने बंद केले. त्यांनी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डिव्हीआर काढून नेला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी गोळीबार केला. यामध्ये दिव्यांग यांच्या डाव्या पायाला गोळी लागली. चोरट्यांनी दुकानात लावलेले आणि दुकानातील तिजोरीत ठेवलेले 62 लाख 50 हजार रुपये किमतीचे अडीच किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.