kudalwadi : दुभाजकाच्या कडेची माती उद्यान विभागासाठी फायदेशीर – दिनेश यादव

एमपीसी न्यूज – शहरातील रस्त्यांची कितीही वेळा साफसफाई केली, तरीही दिवसभरात धूळ व माती या रस्त्याच्या व दुभाजकाच्या कडेला जमा होत आहे. दुभाजकाच्या कडेला जमा होणारी माती ही मनपाच्या उद्यान विभागासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे ही माती काढावी अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड मनपाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. चिखली-मोशी परिसरात महापालिकेच्या वतीने अनेक विकासकामे सुरु आहेत. त्यात रस्ते व विविध विकासकामांचा समावेश आहे. परंतु, या विकासकामामुळे कुदळवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

यादव पुढे म्हणाले की, महापालिकेने लाखो रुपये खर्चून रस्त्याची कामे केली आहेत. परंतु, महापालिकेच्या वतीने या रस्त्यांची कितीही वेळा साफसफाई केली, तरीही दिवसभरात धूळ व माती या रस्त्याच्या व दुभाजकाच्या कडेला जमा होत आहे. त्यामुळे रस्ता दुभाजकाच्या कडेला जमा झालेली माती वाहनांच्या व नागरिकांच्या आरोग्य समस्या निर्माण करीत आहे.

त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याचा धोका असून, काही वेळा धूळ उडून अपघाताचीही शक्यता बळावत आहे. महापालिकेच्या वतीने रस्ता दुभाजकाच्या कडेला जमा होणारी माती हटवण्यासाठी ठोस कार्यवाही करावी. जेणेकरून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या व वाहतूकीस अडथळा निर्माण करणारी समस्या नाहीशी होईल. तसेच दुभाजकाच्या कडेला जमा होणारी माती ही मनपाच्या उद्यान विभागासाठी वापरली जाऊ शकते. त्यासाठीही कार्यवाही करावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी या बैठकीत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.