Chikhali News: कुदळवाडी महापालिका शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग होणार सुरू, दिनेश यादव यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – कुदळवाडीतील महानगरपालिका शाळेमध्ये पहिली ते सातवी वर्ग भरत असून, सातवीनंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरत्र जावे लागत आहे. महापालिका शाळेच्या नवीन झालेल्या इमारतीमध्ये आठवी ते दहावी वर्ग सुरू करणे शक्य असल्याचे लक्षात येताच स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून महापालिकेने यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ सुरू केली असून, लवकरच परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा सतावीपुढील शिक्षणाचा प्रश्न मिटणार आहे.

कुदळवाडी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक- 89 येथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग सुरु करण्यास मान्यता आहे, परंतु आठवीच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इतरत्र जावे लागते. कुदळवाडी भागात कामगार, मजुर वर्ग तसेच हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी शाळेची फी परवडण्यासारखी नसल्याने पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यावर यादव यांनी तात्काळ पाठपुरावा सुरू केला तसेच आठवीपासून पुढील वर्ग सुरू करण्याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाला लेखी निवेदन दिले. याबाबत महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत हे शक्य असून याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सांगितले. तसेच याबाबत काही सूचना करत संबंधित विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले. यामुळे गरीब विध्यार्थ्यांच्या सातवी ते दहावी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आठवी ते दहावी वर्गासाठी प्राथमिक प्रक्रिया झाली असून यानंतरही अनेक तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. शाळेकडूनही याबाबत प्रस्ताव पाठवावा लागणार असल्याने शाळा व्यवस्थापणासोबत चर्चा करून कार्यवाही करावी लागणार आहे. शिक्षण ही मूलभूत गरजच नसून प्रत्येकाचा हक्क आहे. गोरगरिबांना हा हक्क मिळवून देण्यासाठी शाळेत आठवी ते दहावी वर्ग प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत पाठपुरावा करणार आहे. 

– दिनेश यादव, स्वीकृत सदस्य, फ प्रभाग.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.