Chikhali : कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार दुकाने हटविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – चिखली मधील कुदळवाडी परिसरात हजारो भंगार दुकाने असून ती अनधिकृत असल्याचे सांगत चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने हटविण्याची मागणी केली आहे. पालिका आयुक्तांना फेडरेशन कडून निवेदन देण्यात आले आहे. सतत लागणारी आग आणि इतर प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे फेडरेशनच्या निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर भंगार दुकाने आहेत. विशेषतः कुदळवाडी (Chikhali) या भागामध्ये पाच ते सहा हजार अनधिकृत भंगार दुकाने आहेत. या दुकानांमध्ये रात्रीच्या वेळी प्लास्टिक जाळले जाते. लोखंड वितळविले जाते. इतर केमिकलयुक्त पदार्थ रात्रभर जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तसेच कुदळवाडी परिसरात आग लागण्याचे प्रमाणही ज्या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणात आहे.

 

कुदळवाडी परिसरात दोन पेट्रोल पंप आहेत. या पंपांना आगीची झळ बसल्यास त्यातून मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून ही दुकाने हटविण्याची मागणी फेडरेशनकडून करण्यात आली आहे. तसेच या भंगार दुकानांना पालिकेकडून दिले जाणारे वीज आणि पाणी बंद करण्याचीही मागणी केली आहे.

Pune : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, कुदळवाडी भागात पाच ते सहा हजार अनधिकृत भंगार दुकाने रहिवासी जागेत उभी आहेत. विशेषतः या अनधिकृत भंगार दुकानांना पालिकेकडून पाणी आणि वीज पुरवली जाते. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या आमच्या सोसायटीधारकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. परंतु या कुदळवाडी भागातील पाच ते सहा हजार भंगार दुकानांना मुबलक प्रमाणात पाणी दिले जाते.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही सर्व दुकाने त्वरीत हटवून आमच्या नागरिकांचे प्रदूषणापासून होणारे नुकसान थांबवावे. पुढील दोन ते तीन महिन्यात यावर कारवाई न झाल्यास फेडरेशन मार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.