Pimpri : अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी होणा-या सीईटी परीक्षांची केंद्र लहान शहरांमध्येही असावीत

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या सीईटी परीक्षेचे केंद्र विद्यार्थ्यांच्या रहिवासी पत्त्यापासून जवळच्या ठिकाणी असावे. त्यासाठी लहान शहरांमध्ये देखील सीईटी परीक्षा केंद्र सुरु करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षा वर्षा जगताप यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

वर्षा जगताप यांनी याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, बारावी नंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षांची केंद्र राज्यातील ठराविक शहरांमध्ये आहेत. सर्व विद्यार्थ्यांना दळणवळणाची संसाधने, वेळ तसेच आर्थिक बाबींमुळे मोठ्या शहरात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ही परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे होते.

नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेची केंद्र लांबच्या ठिकाणी असल्याने विद्यार्थ्यांची फरफट झाली. जुन्नरच्या मुलांचे नंबर हडपसरसारख्या ठिकाणी आले. परीक्षा सकाळी ९ ते १२ या वेळेत होती, मात्र सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. ग्रामीण भागातील मुलांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना मोठी कसरत करावी लागली. सकाळी नऊ वाजता लॉग इन करणे आवश्यक होते, मात्र पावणेनऊ वाजता गेलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला गेला. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

त्यामुळे सीईटी परीक्षा स्थानिक ठिकाणी घेण्यात यावी. परीक्षेच्या वेळेत लवचिकता असावी. ठराविक वेळेपर्यंत परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना उशीर झाला असला तरी त्यांना परीक्षेस बसण्याची मुभा मिळावी. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. परीक्षा देता न आल्याने विद्यार्थी काही वेळेला नको ते पाऊल उचलतात. त्यामुळे शासनाने याबाबत योग्य बदल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.