Maval LokSabha Election : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी – चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज – एकजुटीनं .. दूरदृष्टीने चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान..,  लोकशाहीचा करायचा सन्मान..,100 टक्के हो करायचं मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.. हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड मध्ये सकाळी घुमत असल्याचे दिसते. निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात ही मतदान (Maval LokSabha Election) जनजागृती होत आहे. 

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे, यामुळे आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी (Maval LokSabha Election) सांगितले.

 

Maval Loksabha Election: मतदान यंत्रांची रँडमायझेशन; 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट

 

पुढे बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, मतदान जनजागृती करत असलेले वासुदेव हे नाट्यकर्मी नसून खरेखुरे वासुदेव आहेत. त्यांच्यामार्फत लोकगीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील नवमतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पडावे,  आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो? अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत जा, मतदान करून आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन हे वासुदेव करत आहेत. शहरातील उद्याने, सोसायट्या आणि विविध भागात सकाळी 6 ते 10 या वेळेत ही जनजागृती करण्यात येत आहे. या मतदान जनजागृतीसाठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचे नियोजन आदि बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग, आसाराम कसबे, संतोष रासने सांभाळत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.