Alandi: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत आळंदीच्या गोरक्षवल्ली-शांभवी-अजान वृक्षाचे रोपण

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्री राम मंदिरात22जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी (Alandi)आळंदी-सिद्धबेट येथील गोरक्षवल्ली-शांभवी-अजान वृक्षाचे बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून माऊली हरीत अभियाना अंतर्गत श्री राम जन्मभूमी अयोध्येत शरयू तटावर, वाराणसीत श्री काशी विश्वनाथ आणि गोरखपुरच्या श्री गोरखनाथ मंदिरात विधिवत पूजन करून मंदिर प्रांगणात-परिसरात मान्यवरांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले.
श्री राम जन्मभूमी अयोध्येत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना(Alandi) वृक्षाचे रोप ३ जानेवारी रोजी राम जन्मभूमी मंदिर परिसरात लावण्यासाठी सादर करण्यात आले होते. याप्रसंगी कारसेवक पुरमचे शरद शर्मा, मिडीयाचे प्रमोद मजुमदार आणि छत्रपती चौधरी हे देखील उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या हस्ते गोरक्षवल्ली वृक्षाच्या माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.
त्याच दिवशी रामनगरी अयोध्येतील उदासीन ऋषी आश्रमातही गोरक्षवल्लीचे रोप लावण्यात आले.
  याप्रसंगी उदासीन ऋषी आश्रमाचे महंत श्री. भारद्वाज, उमराव सिंह,  धनवान सिंह, राकेश सिंह मान, कृष्ण प्रकाश सिंह,  अभिषेक शुक्ला, मानवेंद्र सिंह, मूलचंद निषाद, डॉ. सचिन पुणेकर, शैलेंद्र पटेल, दत्तात्रय गायकवाड, अशोक थोरात, गिरीश गोखले व भागवतम् कुटिकेचे महंत माताजी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट ला सुपूर्त केलेल्या रोपाचे रोपण मकर संक्रांतिला अर्थात १५ जानेवारीला शरयू तटा वरील क्रुझ उद्यानात अयोध्येचे नगर आयुक्त विशाल सिंह, वन विभाग अधिकारी सुधीर चौधरी, महंत शाम दास, धनवान सिंह, श्रीमती माताजी, अनुज दास, पार्षद, इन्द्र भान सिंह, चंद्रभान सिंह, मानवेंद्र प्रताप सिंह, विशाल तिवारी, सुनील शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच गोरक्षवल्लीचे रोपण गोरखपूरला श्री गोरक्षनाथ मंदिरात  मठाचे संचालक द्वारका प्रसाद तिवारी, मंदिर व्यवस्थापक रमेश पाठक आणि वाराणसीत श्री काशी विश्वनाथ मंदिरात काशी विश्वनाथ ट्रस्टचे एस.डी.एम. श्री शंभू शरण, मंदिर प्रशासन कर्मचारी अभिषेक (ज्ञानेश्वर) नारायण सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या पर्यावरणीय व आध्यात्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या वृक्षाच्या बाबतीत जनमानसात जाण वाढावी या उद्देशाने हिंदी भाषेतील या वृक्षाच्या माहिती पत्रकाचे अनावरण वर नमूद मान्यवरांच्या हस्ते देखील करण्यात आले. सदर सर्व उपक्रमांच्या यशस्वी नियोजनाकरिता डॉ. सचिन पुणेकर, शैलेंद्र पटेल, दत्तात्रय गायकवाड, श्री. धनवान सिंह, गिरीश गोखले, अशोक थोरात, अभिषेक नारायण सिंह, भागवतम् कुटिकेच्या माताजी, तसेच अयोध्येचे ए.डी.एम. सलील कुमार पटेल, एस.डी.एम. संजीवकुमार श्रीवास्तव, वनविभागाचे अधिकारी सुधीर चौधरी, पुणे रेल्वे अधिकारी एडीआरएम ब्रिजेश कुमार सिंग आणि सर्व नमूद ट्रस्टच्या कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य मिळाले.

 ही सर्व तीर्थक्षेत्रे उत्तर प्रदेशातील आहेत. हिंदू धर्मात या तीर्थक्षेत्रांना विशेष असे आदराचे स्थान आहे. अशा विविध अध्यात्मिक आणि महातीर्थक्षेत्री गोरक्षवल्ली-शांभवी-अजानवृक्षाचे रोपण होणे ही एक महत्वपूर्ण घटना आहे. या अजानवृक्षाची रोपे ही आळंदीयेथील सिद्धबेट या पुरातन शिवपीठ परीसरातील (निवृत्तीनाथ-ज्ञानदेव-सोपानदेव-मुक्ताई यांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आले आहे, जणू त्याचीच प्रतिकृती. संत साहित्याचा अभ्यास केला असता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. अयोध्येत भगवान श्री राम, गोरखपूरमध्ये बाबा श्री गोरक्षनाथ आणि वाराणसीमध्ये बाबा श्री काशी विश्वनाथ यांच्या सन्निध्य गोरक्षवल्ली-शांभवी-अजान वृक्षाच्या रूपात श्री संत ज्ञानेश्वर माऊलीजींची स्थापना झाली हे विशेष. नाथ, दत्त आणि वारकरी संप्रदयात ह्या देव-वृक्षाला विशेष महत्व दिले आहे. गोरक्षवल्ली, शांभवी, अजानवृक्ष, योगवल्ली, योगिनी, निधी, पूर्णधन, गोरक्षगुल्म, महावल्ली अश्या अनेक नावांनी हा वृक्ष सुपरिचित आहे.
बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री क्षेत्र आळंदी – सिद्धबेट येथील मूळ ज्ञानवृक्ष-अजानवृक्षाची रोपे सर्वदूर (योग्य त्या ठिकाणी) पोहचवणे होय. एकुणातच काय या औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ज्ञानवृक्षाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधल्या महत्वाच्या वारसा वृक्षाबाबत जनमानसात-भाविकांत काही अंशी जाण वाढावी, त्यांच्यात योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने अजानवृक्ष सर्वदूर करीत आहोत.
आजपर्यंत या हरित वारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे, गडकोट, मंदिरे, अध्यात्मिक-केंद्रे, संजीवन समाधी, विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या आवारात याचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे.
यापुढेही भारतातील अनेक ठिकाणी या वारसा ज्ञानवृक्षाचे रोपण होत राहणार आहे. खऱ्या अर्थाने हरिहराचे प्रतीक असलेला अजानवृक्षाचे शैव आणि वैष्णव तीर्थ असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील तपोभूमी आणि महातीर्थ असणाऱ्या अयोध्या, गोरखपूर, वाराणसी मध्ये रोपण होणे हे ही विशेष. जणू शैव आणि वैष्णवांचा हा सुरेख संगमच…!

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=yiL5tv7B0bU&t=5s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.