Pune Loksabha : आमदार धंगेकर यांच्या उमेदवारीने चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघात (Pune Loksabha) झालेल्या पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे आगामी पुणे  लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत धंगेकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात पराभव झाल्याने आता लोकसभा निवडणूक सोपी होणार असल्याची कुजबुज सुरू आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे. उच्च न्यायालयाने या ठिकाणी पोटनिवडणूक का झाली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करून निवडणूक आयोगाला कडक शब्दांत सुनावले.

काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी 20 जण इच्छुक असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामध्ये धंगेकर यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे. ते एवढयावरच थांबले नाही तर, त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेते मंडळींची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेस पाठोपाठ भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.

पुणे शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांसह २० नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करून अर्ज दाखल केले आहेत. शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येईल. प्रदेशकडून छाननीनंतर काही नावे दिल्लीला कळविण्यात येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे दौरा केला असून, त्यानंतर काँग्रेसकडूनही निवडणूक तयारीचा वेग वाढविण्यात आला आहे. पुणे लोकसभेचा उमेदवार दिल्लीतून ठरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी; आतापर्यंत 15 जणांना अटक

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर (Pune Loksabha), माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, माजी उपमहापौर आबा बागुल, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, विरेंद्र किराड, संगीता तिवारी, नरेंद्र व्यवहारे, प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मानोज पवार, संग्राम खोपडे, दिग्विजय जेधे, असे 20 जण पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी  प्रबळ  इच्छुक उमेदवार आहेत. दरम्यान, भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणे गरजेची होती. ती निवडणूक न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले. आता सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे.

माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे आता काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काँग्रेसचा प्रचार करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.