Alandi :आळंदी नगरपरिषदे मार्फत “आयुष्मान भारत” कार्ड नोंदणीसाठी विशेष अभियान

एमपीसी न्यूज :आळंदी येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र (Alandi) लाभार्थी कुटुंबांना प्रती वर्ष प्रती कुटुंब 5 लाखांचा आरोग्य विमा लाभ मिळविता यावा यासाठी लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने रेशन दुकानदारांच्या सहकार्याने विशेष अभियानाची सुरुवात केली असून याअंतर्गत रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानत बोलावून नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत गोल्डन कार्ड काढून देण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य (Alandi) विमा योजना असून 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरू करण्यात आली आहे. सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहे.

Photo Feature : ताथवडे गॅस स्फोट प्रकरण

या योजनेत अंगिकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते. 5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत 1 हजार 209 शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार समाविष्ट असून पुणे जिल्ह्यात 50 खासगी व 12 शासकीय अशा एकूण 69 रुग्णालयांचा समावेश आहे.

आळंदी नगरपरिषद क्षेत्रात या योजनेत एकुण पात्र लाभार्थी 4529 असून त्यापैकी आतापर्यंत 1914 जणांनी हे कार्ड काढले आहे.उर्वरीत सर्व लाभार्थ्यांचे कार्ड काढण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रात हे अभियान राबिण्यात येत असून याकरीता मुख्याधिकारी केंद्रे यांनी 4 रेशन दुकानावर एकूण 24 अधिकारी,कर्मचारी यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या असून अभियानाच्या पहिल्या दिवशी एकूण 100 जणांचे कार्ड काढण्यात आले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड प्ले स्टोअरवरून “आयुष्यमान भारत” हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून लाभार्थी स्वतः आपल्या मोबाईल मधून देखील काढू शकतो. सर्व लाभार्थ्यांनी स्वतः हुन आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे किंवा आपल नाव आळंदी शहरातील ज्या रेशन दुकानात नोंद असेल तिथे 13 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत आपले आधार कार्ड व मोबाईल घेवून उपस्थित राहून आपले कार्ड काढून घ्यावे जेणेकरून गरजेच्या वेळी आपल्या कुटुंबास 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळू शकतील असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.