Anil Khaire : अनिल खैरे एक अद्वितीय व्यक्तिमत्व!

एमपीसी न्यूज (संकेत भोंडवे IAS)- स्वर्गीय अनिल खैरे, एक निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी होते. त्यांना प्राण्यांबद्दल खूप जिव्हाळा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि प्राणी कल्याणासाठी काम करणार्‍या संपूर्ण समुदायामध्ये शोककळा पसरली आहे. ते एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते यात शंका नाही.

स्व.श्री अनिल खैरे त्यांच्या ज्येष्ठ बंधू समवेत पुण्यात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. निसर्ग आणि विशेषत: सापांसाठीच्या योगदानासाठी खैरे कुटुंब भारतात प्रसिद्ध आहे. माझ्या वडिलांसोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागात सहकारी आणि टीम मेंबर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याचे सर्व गुण असणारे ते एक दुर्मिळ अधिकारी होते.

Voters List: मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम; १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

मी शाळेमध्ये असताना माझ्या वडिलांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. तेव्हापासून मला ते आठवतात. मी त्यांच्या ज्ञानाने, समंजसपणाने आणि त्यांच्याकडील असलेल्या चालू घडामोडीं बद्दलची माहिती तसेच त्यांच्या प्राण्यांबद्दलच्या व पर्यावरणबद्दलच्या माहितीनेही मी प्रभावित झालो होतो.

ते एक उत्तम लेखक, आणि प्राण्यांवर विशेषत: सापांवर विशेष माहीती असलेले आंतरराष्ट्रीय वक्ते होते ज्यांनी भारतातील संयुक्त राष्ट्र संघासोबत काम केले होते. फार कमी जणांनी ही कामगिरी केली आहे. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी प्राणीसंग्रहालयाचे नेतृत्व करत होते.पीसीएमसी मध्ये प्राणी संग्रालय म्हणजे एक विशेष उपलब्धी होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके(PCMC) च्या आकुर्डी प्राणीसंग्रहालयाचे नेतृत्व करत असलेले ते एक नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील व्यक्ती होते ज्यांनी प्राणीसंग्रहालयात आलेल्या अनेक समस्यांचे निराकरण चौकटीच्या बाहेरील उपयांनी केले व त्याचा वापर त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी केला. आम्ही त्यांना व प्राण्यांना भेटण्यासाठी आकुर्डी प्राणीसंग्रहालयाला भेट देत असत. ते सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ञ होते. तसेच ते सर्पप्रेमी असल्याने त्यांनी आपले जीवन सापांसाठी समर्पित केले होते.

या विशिष्ट क्षेत्रात त्यांनी जे काही साध्य केले ते आपल्या शहरातील काहींनीच मिळवले असेल. ते प्राण्यांबद्दलच्या ज्ञानाचे ज्ञानकोश असल्याचे जिवंत उदाहरण होते. माझ्यासाठी ते मार्गदर्शक, विश्वासू सल्लागार आणि तत्त्वज्ञ होते. ज्यांनी मला IAS परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी लहानपणापासूनच माझी ध्येये अचूक ठेवण्यासाठी योग्य रणनीती आणि योग्य मार्ग असावा यासाठी त्यांनी मला संबोधित केले. त्यांच्याबद्दल मी माझ्या “IAS ची पाऊलवाट” या पुस्तकात उल्लेख केला आहे. त्यांनी मला आणि त्यांच्या पुणे आणि आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उत्तेजित केले. यामध्ये डॉक्टरांपासून ते साहसी व्यक्तींपर्यंतचा समावेश आहे. डॉ. अमित कामत, सुरेंद्र शेळके हे त्यापैकीच एक आहेत.

anil khaire

त्यांनी वैयक्तिकरित्या मला केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा अभ्यास करण्यासाठी आणि भारतीय प्रशासकीय सेवा(IAS) मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे स्मितहास्य, वास्तविक जीवनातील केस स्टडी देण्याचा गुण आणि अनुभव शेअर करणे हा त्यांचा अनन्य विक्री प्रस्ताव(USP) होता, ज्याचा आज अनेकांमध्ये अभाव आहे.

आज जरी ते आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य आपल्या सर्वांच्या स्मरणात राहिल. माझ्यासाठी हे एक वैयक्तिक नुकसान आहे कारण त्यांनी माझ्यासाठी दाखवलेले प्रेम आणि आपुलकी नेहमीच विशेष होती. त्यांच्या निधनाने झालेले हे कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्यासाठी ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो.

– संकेत भोंडवे IAS
(लेखक केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांचे स्वीय सहाय्यक (PS) आहेत.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.