Akurdi : अनिल खैरे यांच्या कामाची व्याप्ती फार मोठी – नाना पाटेकर

अनिल खैरे लिखित 'सोयरे वनचरे' पुस्तकाचे नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज  – अनिल खैरे त्यांचा (Pune) मुद्दा फार चांगल्या पद्धतीने मांडायचे. त्यांच्या वन्यजीवांबाबतच्या कामाची व्याप्ती फार मोठी आहे. त्यातील काही भाग ‘सोयरे वनचरे’ या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

सर्पमित्र अनिल खैरे लिखित ‘सोयरे वनचरे’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पुस्तक प्रकाशन समारंभासाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयएएस अधिकारी संकेत भोंडवे, सर्पतज्ञ नीलिमकुमार खैरे, सुनील लिमये, महेश झगडे, अनिल महाबळ, डॉ. दिलीप कामत, गौरी कानेटकर, मंगला कदम तसेच महाराष्ट्रातील पहिले ‘एव्हरेस्टवीर’ सुरेंद्र चव्हाण व वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारे ठाण्याचे ‘एव्हरेस्टवीर’ शरद कुलकर्णी यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली.

 

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ग्रामस्थांना कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अनिल खैरे यांच्यासोबत काम केलेल्या अनिल राऊत, संपत पुलावळे, जयश्री मदने या निवडक सर्पमित्रांच्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नाना पाटेकर म्हणाले, अनिल खैरे यांनी कायम तुटपुंज्या मानधनावर काम केले. वन्यजीव आणि माणूस यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण होणे फार आवश्यक आहे. ते नाते (Pune) अनिल खैरे यांनी निर्माण केले होते. त्यांचे काम फार मोठे असून त्यांच्या पश्चात आपण सर्वांनी ते काम पुढे नेऊयात, असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.

अनिल खैरे यांचे बंधू नीलिमकुमार खैरे यांनी भावंडांच्या बालपणीपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसाठी अनिल खैरे यांनी आयुष्याची 25 वर्षे खर्च केली. त्या उद्यानात अनिल यांची स्मृती उभारावी अशी मागणी करत भविष्यात उद्यानासाठी लागेल ती मदत करण्याचे  आश्वासन त्यांनी दिले.

पुणे विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अनिल खैरे यांचे ज्ञान उपयोगी पडले असल्याचे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. तर अनिल खैरे हे वैज्ञानिक दृष्टिकोन जागा ठेवून कायम नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनिल महाबळ यांनी सांगितले.

सनदी अधिकारी संकेत भोंडवे म्हणाले की, माझ्या यशात अनिल खैरे यांचे मोठे योगदान आहे. खैरे यांच्याकडे प्राण्यांबद्दलच्या माहितीचा खूप मोठा खजिना होता. त्यांनी लहानपणापासून माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला.

सोयरे वनचरे हे पुस्तक म्हणजे अनिल खैरे (Pune) यांच्या कामाची ओळख आहे, असे मत पीएमआरडीएचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले.

निवृत्त प्रधान वनरक्षक सुनील लिमये यांनी अनिल खैरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनिल खैरे कायम मुक्या प्राण्यांचा आवाज बनले. वनविभागाला अनिल आणि नीलिम या दोघा भावांनी कायम मदत केली.

माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या की, समाजात चांगल्या गोष्टींची तळमळ असणाऱ्या माणसांची उणीव सातत्याने भासते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या उभारणीत अनिल खैरे यांचे मोठे योगदान आहे. अनिल यांनी वन्यजीवांच्या बाबतीत मोठे काम केले आहे, असे सांगत कदम यांनी ‘माणसं मोजकीच जोडा, पण ती जीवाला जीव देणारी असावी’ असा सल्ला दिला.

अनिल खैरे लिखित ‘सोयरे वनचरे’ पुस्तकाच्या संहिता संपादक गौरी कानेटकर म्हणाल्या, “अनिल खैरे यांना प्राण्यांबद्दल प्रचंड आत्मियता होती. प्राण्यांना त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जीव लावला. सोयरे वनचरे या पुस्तकाच्या माध्यमातून प्राण्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून प्राण्यांबद्दल गैरसमज दूर करण्याची चळवळ पुढे जाईल.”

सूत्रसंचालन सुनील माळी यांनी केले. तेजस खैरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.