Anil Khaire : नामवंत वन्यजीव तज्ज्ञ व भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे अध्यक्ष अनिल खैरे यांचे निधन

एमपीसी न्यूज – नामवंत वन्यजीव तज्ज्ञ, भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे अध्यक्ष तसेच आकुर्डी येथील निसर्ग कवी बहिणाबाई प्राणी संग्रहालयाचे माजी संचालक अनिल सखाराम खैरे (Anil Khaire) (वय 64) यांचे आज पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पाठीमागे पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. अनिल खैरे (Anil Khaire) यांच्या पार्थिवावर रात्री पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

अनिल खैरे यांचे शालेय शिक्षण ऑर्नेलास हायस्कूलमध्ये झाले. ग्लोबल ओपन युनिव्हर्सिटी नागालँड तसेच डुरेल कॉन्झर्वेशन अकॅडमीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. टाटा मोटर्स कंपनीत त्यांनी काही काळ सेवा केली. स्पेसिज 360 मध्येही त्यांनी काम केले. भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे ते अध्यक्ष होते.

Breaking news: 14 फुटी अजगराला, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कडून मिळाले जीवनदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी सर्पोद्यान म्हणजेच निसर्गकवी बहिणीबाई प्राणी संग्रहालयाचे संचालक म्हणून त्यांनी स्थापनेपासून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. 1989 ते 2013 पर्यंत ते (Anil Khaire) सर्पोद्यानाचे संचालक होते. सर्पोद्यानात अनेक सुधारणा करून लोकप्रिय बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्राणी संग्रहालयातील सापांपासून सर्व प्राण्यांवर ते जीवापाड प्रेम करीत. अशाच एका प्रसंगात बिबट्याने त्यांच्या हाताचा चावा घेतल्यामुळे ते जखमी झाले होते.

जंगलातून वाट चुकून मनुष्यवस्तीत आलेल्या शेकडो प्राण्यांना जीवदान देऊन त्यांना पु्न्हा निसर्गात सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. पुण्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात प्राण्यांची काळजी घेण्यात त्यांना विशेष रुची होती.

वन्यजीव तज्ज्ञ तसेच सर्पतज्ज्ञ म्हणून अनिल खैरे (Anil Khaire) यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक होता. अनेक आंतरराष्ट्रीय वन्यजीव प्रकाशनांमध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत. जगाच्या विविध भागात जाऊन त्यांनी वन्यजीव विषयक अभ्यास केला होता. वन्यजीव विषयक अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने देखील दिली होती. अनेक वृत्तपत्रांसाठी त्यांनी वन्यजीव विशेषज्ञ म्हणून नियमित लेखन केले होते.

सर्पांविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने जनजागृतीसाठी प्रयत्न केला.

गिर्यारोहणाविषयी देखील त्यांना विशेष रुची होती. पिंपरी-चिंचवडमधील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेत मार्गदर्शक म्हणून अनिल खैरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक अवघड सुळक्यांवरील प्रस्तरारोहणाचे मार्ग सुरक्षित करण्यासाठी त्यांनी गिर्यारोहक मित्रांच्या मदतीने केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते. सेफ क्लायंबिंग इनिशिएटीव्ह या संस्थेचे ते अध्यक्ष होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.