Bhosari: किंगमेकर दत्ताकाकांचे, लक्ष्य भोसरी विधानसभेचे!

निमित्त वाढदिवसाचे, शक्तीप्रदर्शन निवडणुकीचे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता (काका) साने यांनी वाढदिवसानिमित्त भोसरी मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. त्यानिमित्त भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली असून त्या फलकांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष्य वेधले आहे. त्याचबरोबर अनेक फलकांवर ‘लक्ष्य 2019 भोसरी विधानसभा’ असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे काकांनी वाढदिवसाचे निमित्त साधून आगामी भोसरी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे, स्पष्ट संकेत दिले आहेत.

भोसरी विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी महापौर मंगला कदम यांना मिळाली होती. तर, तत्कालीन हवेली मतदार संघाचे आमदार असलेल्या विलास लांडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती. लांडे यांच्या प्रचाराची धुरा दत्ता काकांनी पार पाडली होती. लांडे यांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले होते.

सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी विलास लांडे यांना जाहीर झाली. त्यामुळे महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकली. मोदी लाटेत देखील लांडगे 15 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. लांडगे यांच्या विजयातही साने यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मतदारसंघ अस्सित्वात आल्यापासून झालेल्या दोन्ही निवडणुकीत साने यांनी ‘किंगमेकर’ची भूमिका पार पाडल्याचे, बोलले जाते. साने ज्यांच्यासोबत त्यांचा विजय अशी चर्चा भोसरी मतदार संघात सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर साने यांचे महेश लांडगे यांच्याशी देखील फिस्कटले. महापालिका निवडणुकीवेळी ‘नारळ’ ग्रुप भाजपमध्ये गेला असताना साने यांनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. राष्ट्रवादीकडून त्यांनी चिखलीतून पालिकेची निवडणूक लढविली. भाजपची लाट असतानाही ते चिखलीतून चार हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यांची ही सलग तिसरी टर्म असून सध्या त्यांच्याकडे पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आहे. या माध्यमातून ते सत्ताधा-यांना घेरत आहेत. महापौर, उपमहापौरपदाची निवणडूक त्यांनी बिनविरोध होऊ दिली नाही.

भोसरी विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावलेल्या साने यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तथापि, भोसरीतून दोन्ही वेळेस अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे साने राष्ट्रवादीकडून की अपक्ष निवडणूक लढवितात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.