Bhosari News: परिवर्तन ‘हेल्पलाइन’कडे तक्रार आली अन् बंद सिग्नल सुरू झाले

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावरील उपबाजार समिती चौकात काही दिवसांपूर्वी जुने सिग्नल दिवे काढून नवीन सिग्नल बसविण्यात आले. परंतु, काही दिवसांपासून ते बंद होते, याबाबत काही नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांनी सुरू केलेल्या परिवर्तन हेल्पलाइनकडे तक्रार केली. तक्रार आल्यानंतर काही तासातच हे सिग्नल सुरू झाले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील उपबाजार समिती चौकात काही दिवसांपूर्वी जुने सिग्नल दिवे काढून नवीन सिग्नल बसविण्यात आले. परंतु, काही दिवसांपासून ते अचानक बंद झाल्यामुळे येथे अपघातात वाढ झाली होती. सिग्नल बंद असल्यामुळे अनेकदा स्थानिक नागरिक, बाजार समितीत येणारे ग्राहक, महिला, मुले, वयोवृद्ध नागरिक यांना हा महामार्ग ओलांडून जाणे जीवावर बेतणारे होते. यामुळे येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने संपूर्ण सिग्नल यंत्रणा नव्याने उभारली व ती सुरळीत व नियंत्रित होती. ही यंत्रणा काही दिवस सुरू ठेवली व नंतर अचानक बंद करण्यात आली.

सिग्नल यंत्रणा बंद झाल्यामुळे वाहनांची ये-जा करताना अडचण होत होती.वाहतुकीला कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील होत होती.  याशिवाय नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे काही नागरिकांनी पुढाकार घेत परिवर्तन हेल्पलाइनकडे दाद मागितली. परिवर्तन हेल्पलाइनकडे याबाबत तक्रार आल्यानंतर तातडीने सूत्रे हलवण्यात आली. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत ही सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.