Pune News : समाविष्ट गावांमधील नेते ठरताहेत प्रशासनाची डोकेदुखी

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 11 गावांमध्ये प्रकाश व्यवस्थेसाठी पथदिवे उभारण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र, गावांमधील माजी लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी आम्ही सांगू तेथेच पथदिवे व प्रकाश खांब उभारावेत, असा आग्रह धरत प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यामुळे गावातील नेतेमंडळी डोकेदुखी ठरत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

राज्य शासनाने 2017 मध्ये लोहगांव, केशवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, उंड्री, आंबेगांव खुर्द, आंबेगांव बुद्रुक, धायरी, शिवणे, उत्तमनगर या 11 गावांचा महापालिकेच्या हद्दीत समावेश केला आहे. या गावांचा समावेश झाल्यापासून गावांमध्ये ग्रामपंचायतीने तयारी केलेलीच प्रकाश व्यवस्था वापरण्यात येत आहे. मात्र, प्रकाश व्यवस्थेतील बहुतांश विद्युत खांब कमी जास्त उंचीचे असल्याने प्रकाशाचे प्रमाण कमी जास्त आहे.

ही गावे महापालिका हद्दीत येवून चार वर्षे होत आली, तरीही महापालिका येथील नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा देवू शकली नाही. ही गावे केवळ कर संकलीत करण्यासाठी महापालिका हद्दीत घेतली आहेत का असे सवाल गावांमधील नागरिकांकडून वारंवार व्यक्त केले जातात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या गावांमधील रस्ते, पाणी, कचरा, सांडपाणी व मौलापाणी व्यवस्थापन व प्रकाश व्यवस्थेची कामे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

गावांमधील प्रकाश व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. फुरसुंगी गावासाठी 28 लाख तर इतर 10 गावांसाठी प्रत्येकी 21 लाख रुपये  असे 2 कोटी 38 लाख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गावांमध्ये पथदिवे उभारण्याचे नियोजन पालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, गावांमधील आजी-माजी लोकप्रतिनिधी व नेतेमंडळी आम्ही सांगू तेथेच प्रकाश व्यवस्था करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत आहेत. राहतो तो परिससर, जवळचे नातेवाई, कार्यकर्ते, प्रभाव क्षेत्र आदी ठिकाणे प्रकाश खांब उभारण्यासाठी सुचविली जात आहे. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वीच गावांमधील नेते मंडळी प्रशासनाची डोकेदुखी ठरत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.