Bhosari : दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या वृद्धाला दुचाकीची धडक बसली. यामध्ये जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 18 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी भोसरी येथील गुडविल चौकात झाला.

अकम शब्बीर शेख (वय 28, रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उद्धव रतन घोरपडे (रा. वैद वस्ती, पिंपळे गुरव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शब्बीर याकूब शेख असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकम यांचे शांतीनगर भोसरी येथे सलूनचे दुकान आहे. 18 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता अकम आणि त्यांचे वडील दोघेजण दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले. फिलिप्स चौकाजवळ आल्यानंतर अकम सायकलवरून घरी निघून गेले. त्यांचे वडील पायी चालत येत होते. त्यावेळी उद्धव त्याच्या दुचाकीवरून (एम एच 26 / ए एन 9261) जात होता. उद्धव याच्या दुचाकीचा धक्का शब्बीर यांना लागला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी उद्धव याने तात्काळ पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.