Pune : शहीद जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी उपक्रम व्हावेत- गिरीश बापट

जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता आणि पोलिसांचा गौरव

एमपीसी न्यूज- सैनिकांच्या योगदानासाठी शासन त्यांच्या नियमानुसार सैनिकांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करतच असते. पण, ज्या जवानांच्या सीमेवरील उपस्थितीने, बहादुरीने आणि बलिदानाने देशाचे, देशातील बांधवांचे रक्षण होते. अशा जवानांच्या प्रती समाजाचेही काही कर्तव्य आहे. या जवानांच्या प्रति आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी उपक्रमांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

निमित्त होते जय महाराष्ट्र तरुण मंडळ आणि भाजप नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांच्या संयुक्त विद्यमाने, सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्‍या शहीद कुटुंबियांसाठी कृतज्ञता सोहळ्याचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच पोलीस अधिकारी स्वाती चितलकर, नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत तसेच ‘फाईट’ चित्रपट फेम सायली आणि जीत हे कलाकार उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते 51 शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. याप्रसंगी १२ कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ​किशोर नारंग, संभाजी शिर्के, सुरेश भेंगडे ​यांचा समावेश होता. १५ ज्येष्ठ समाजसेवकांचा देखील सन्मान करण्यात आला. ​युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांना व्हीलचेअरचे वाटप गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

देशावर आक्रमण होऊ नये म्हणून छातीवर शत्रुची गोळी झेलणाऱ्या कुटुंबियांना सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष होते, असे तेजेंद्र कोंढरे यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजेंद्र कोंढरे आणि सूत्रसंचालन जतिन पांडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.