Pimpri : लघुउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करण्यात आला. पाठपुरावा करुनही वीज दरवाढ, शास्तीकर, माथाडी कायदा हे प्रश्‍न अद्याप प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विनोद नाणेकर यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत सभेपुढे मांडला. त्यानंतर खजिनदार संजय ववले यांनी 2017-18 या वर्षीचा ताळेबंद सभेपुढे मांडला. त्यास सभेने बहुमताने मंजुरी दिली. गेल्या आर्थिक वर्षात संघटनेने लघु उद्योगासाठी केलेल्या कामाचा आढावा संजय सातव यांनी घेतला. उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सन 2019 या वर्षीचे अंदाजपत्रक सभेपुढे मांडले. त्यास सभेने बहुमताने मंजुरी दिली.

सध्या उद्योगांना जाणवणाऱ्या समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. संघटनेचे संस्थापक तात्या सपकाळ, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, नितीन बनकर, संचालक प्रमोद राणे, कैलास भिसे, दीपक फल्ले यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. अध्यक्षीय भाषणात संदीप बेलसरे यांनी वीज दर वाढ, शास्ती कर, माथाडी कायदा तसेच इतर उद्योगाशी संबंधित प्रश्‍न मांडत संघटना हे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली.

या सभेस संघटनेचे संचालक विजय खळदकर, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, नवनाथ वायाळ, विनोद मित्तल, हर्षल थोरवे, प्रवीण लोंढे, प्रमोद राणे, भारत नरवडे, शांताराम पिसाळ, प्रमोद दिवटे, कैलास भिसे, सुरेश जपे, विजय भिलवडे, निस्सार सुतार, बशीर तरसगार, चांगदेव कोलते, अनिल कांकरिया, शशिकांत सराफ, सुहास केसकर, प्रभाकर धनोकार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव जयंत कड यांनी केले. संजय आहेर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.