Chakan Crime News : वाहन चालकांना कागदपत्रे मागणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक

एमपीसी न्यूज – चौकात राजरोसपणे उभा राहून रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना कागदपत्रे मागणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. हा तोतया पोलीस उपनिरीक्षक आळंदी फाटा मेदनकरवाडी येथे उभा राहून वाहनचालकांना कागदपत्रे मागत होता.

सुनील तुळशीराम जाधव (वय 28, रा. कातरवाडी, पो. कासोळा, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत ट्रॅफिक वॉर्डन विकास चव्हाण (वय 36) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास आळंदी फाटा, मेदनकरवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास चव्हाण हे ट्रॅफिक वॉर्डन असून ते चाकण वाहतूक विभागात स्पायसर चौकी येथे वाहतूक नियमनाचे काम करतात. सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी वाहतूक नियमन करत असताना लखन बाळासाहेब गवते फिर्यादी यांच्याकडे आले. ‘एक खाजगी ड्रेस वरील व्यक्ती रस्त्याच्या कडेला पोलीस असल्याचे सांगून आळंदी फाटा चौकात वाहने अडवून कागदपत्रे व लायसन्स मागत आहे’, असे गवते यांनी फिर्यादी यांना सांगितले.

‘कागदपत्रे मागणारा व्यक्ती हा पोलीस नसल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे तुम्ही खात्री करण्यासाठी चला’. अशी गवते यांनी फिर्यादी यांना विनंती केली. त्यानुसार फिर्यादी आळंदी फाटा मेदनकरवाडी येथे गेले. त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली. त्यावेळी त्या व्यक्तीने ‘मी पीएसआय आहे’, असे सांगितले.

त्या व्यक्तीने चक्क पोलीस निरीक्षक असल्याचे ओळखपत्र देखील काढून दाखवले. त्यावर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक, नाव आडे सतीश के आणि त्याखाली आयडी कार्ड नंबर पी 0878 असे लिहिले होते. त्या कार्डच्या मागील बाजूला मोबाईल क्रमांक देखील होता. परंतु फिर्यादी यांना त्या व्यक्तिचा संशय आल्याने त्यांनी संबंधित तोतया पोलीस उपनिरीक्षकाला चाकण पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव सांगितले. याबाबत आरोपी सुनील जाधव याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 170, 171 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.