Chakan : नमाज पठनानंतर कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय जाहीर;चाकण मध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन

आषाढी एकादशी व बकरी ईद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक एकोपा राखण्याच्या हेतूने चाकण (ता. खेड) गुरुवारी (दि. 29) आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी द्यायची नाही, तर कुर्बानीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.30) ते पुढील दोन दिवस आयोजित करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात (Chakan) आला. सकाळी नमाज पठन झाल्यानंतर मुस्लीम समाजातील जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी या बाबत केलेल्या आवाहनाला संपूर्ण शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

Chhajed Parivar Mandal : अ. भा. छाजेड परिवार मंडळाच्या खर्चावर देवस्थान समितीकडून निर्बंध

हिंदू-मुस्लिम समाजात सलोखा असल्याचे चित्र चाकण शहरात गुरुवारी पहावयास मिळाले. हिंदू बांधवानी आषाढी एकादशी व मुस्लीम बांधवानी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली . गुरुवारी सकाळी चाकण मधील विविध प्रार्थना स्थळांवर मुस्लीम समाजाने नमाज पठन केले.

त्यानंतर आषाढी एकादशी दिवशी मुस्लिम समाजाने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतल्याचे चाकणचे माजी उपसरपंच साजिद सिकीलकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अस्लमभाई सिकीलकर, जमीर काझी, मुबीन काझी, नसरुद्दिन इनामदार, समीर सिकीलकर, अजित सिकीलकर आदींनी सांगितले. दरम्यान चाकण मधील मुस्लीम बांधवांची मेंढ्या व बोकड यांच्या मांस विक्रीची  ( मटन शॉप ) दुकाने देखील बंद असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

चाकण मधील विविध ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह पोलिसांच्या पथकांनी नमाज पठन वेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पूर्व संध्येला खुद्द पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी चाकण मध्ये येऊन येथील स्थितीचा आढावा घेतला (Chakan) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.