Chinchwad Bye Election :  दिव्यांगानी घेतली ईव्हीएम यंत्राची माहिती

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी  रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. निवडणूक विभागामार्फत  निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय, थेरगाव येथे तळमजल्यावर मतदारांना ईव्हीएम यंत्रावर मताधिकार बजावण्यासाठी माहितीपर मार्गदर्शन सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी आज दिव्यांगाना ईव्हीएम यंत्राची (Chinchwad Bye Election) माहिती देण्यात आली.

 

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोग  प्रयत्न करीत आहे. प्रत्येक घटकाला निवडणूक  प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी या प्रक्रीयेत दिवसेंदिवस आमुलाग्र बदल होत आहेत. दिव्यांगांना स्वावलंबीपणे सहजतेने मताधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा दिव्यांगाना आत्मनिर्भर करण्यासाठी क्रांतीच्या दिशेने पडलेले पुढचे पाऊल आहे, अशी भावना आज (शुक्रवारी) दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.

 

Chinchwad News : लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकांची शक्यता – अजित पवार

 

निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली तज्‍‌ज्ञ प्रशिक्षक म्हणून  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक ज्योत सोनवणे, निदेशक शिवदास वाघमारे, सतीश गायकवाड, जीवन ढेकळे अरुण बांबळे, विष्णू साबळे, तानाजी कोकणे, चिंचवड बधीर मूक विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ता गणेश टिळेकर, वाचा उच्चार तज्ज्ञ बालाजी गीते,  वि. रा. रुईया मूक बधीर विद्यालयाचे वाचा उच्चार तज्ज्ञ शरद फड यांची नेमणूक  या कामकाजासाठी करण्यात आली आहे.

दोन दिवस सकाळी  11 ते सायंकाळी  5 वाजे पर्यंत आयोजित केलेल्या या उपक्रमाला विविध घटकातील  नागरिकांनी चांगला  प्रतिसाद दिला. आज चिंचवड मतदार संघातील दिव्यांगांना ईव्हीएम यंत्रावर मताधिकार बजावण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राज्य उपाध्यक्ष जनार्दन कोळसे म्हणाले, दिव्यांगांना ईव्हीएम मशीनद्वारे मताधिकार कसा बजावण्यासाठी दिलेल्या माहितीमुळे लोकशाहीतील महत्वाच्या घटनेचे आम्हाला दर्शन घडवले, हा आमच्यासाठी अद्भुत क्षण आहे. निवडणूक कामकाजात मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी वापरात येत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये दिव्यांगांचा विचार करून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा अंतर्भाव या प्रक्रियेत करण्यात आला, ही समाधानाची बाब आहे.

अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका आणि बॅलेट युनिटवर असलेली ब्रेल लिपी, अल्पदृष्टी असणा-या व्यक्तींसाठी मॅग्निफायिंग ग्लासची सुविधा, मूक बधीर व्यक्तींना वाचा उच्चार तज्ज्ञामार्फत दिलेली माहिती या सर्व बाबींमुळे इतर कोणाच्याही मदतीशिवाय आता आम्हाला स्वतः मताधिकार बजावता येणार आहे, याचा आनंद आहे. निवडणूक यंत्रणेने मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष स्वयंसेवक  नेमले आहेत, व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या मतदार संघातील सर्व दिव्यांग मतदारांनी आवर्जून आपला मताधिकार बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोळसे यांनी केले.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात येणार आहे. अशिक्षित, वयोवृद्ध, नवोदित मतदारांना ईव्हीएम मशीन द्वारे (Chinchwad Bye Election) मताधिकार बजावताना  कोणत्याही अडचणी येऊ नये, आपले मतदान झाले आहे की किंवा नाही, आपले मतदान आपण दिलेल्या उमेदवारालाच झाले आहे किंवा कसे  याबाबत या उपक्रमात माहिती दिली जात आहे. दिव्यांग व्यक्ती करीता भारत निवडणूक आयोगाने अॅप सुरु केले आहे, त्याचा देखील वापर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.