Chinchwad : शिवशंभो व्याख्यानमालेच्या अंतिम पुष्पात अभिवाचनाच्या आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून (Chinchwad) शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालाचे अंतिम पुष्प नरेंद्र आमले आणि उमेश घळसासी यांनी केलेल्या प्रभावी अभिवाचनाने गुंफण्यात आले.

विधानपरिषद आमदार उमा खापरे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश मोरे, उद्योजक बसवराज कोळी, श्रीकांत करोळे, सुनील कदम, सुजीत साळुंखे, महेश पवार, बाजीराव चासकर, दिलीप जाधव, महेश पवार, सुदर्शन आहेर, गोपीचंद जगताप तसेच शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे आदी उपस्थित होते.

रंगमुद्रा थिएटर प्रस्तुत योगेश सोमण लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्युशी संवाद’ या चरित्रपर साहित्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे काळपुरुषाशी केलेल्या संवादातून आपला जीवनातील ठळक आठवणी उलगडून सांगत आहेत, अशी विलक्षण कल्पना मांडली होती.

Makarand Ranade : पिंपरी-चिंचवडचे पहिले अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती

आपले जीवितकार्य सफल झाले आहे म्हणून कृतकृत्य होऊन सावरकरांनी 1 फेब्रुवारी 1966 रोजी प्रायोपवेशन व्रत स्वीकारले. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे पंचप्राण पंचत्वात विलीन झाले. या सव्वीस दिवसांच्या कालावधीत मृत्यू त्यांच्याशी हितगुज करीत असताना वयाच्या सोळाव्या वर्षी चापेकर बंधूंच्या हौतात्म्यामुळे अस्वस्थ झालेल्या विनायकाने शत्रूशी मारता मारता मरेपर्यंत झुंजेन ही केलेली प्रतिज्ञा, मित्रमेळावा, 1 जानेवारी 1900 रोजी स्वातंत्र्यलक्ष्मीचा केलेला जयघोष, विदेशी कपड्यांची होळी, अभिनव भारतची शपथ, लंडन येथील इंडिया हाउसमध्ये बॉम्ब बनविण्याचे प्रात्यक्षिक, 21 पिस्तुले हिंदुस्थानात धाडण्याची योजना, डॉ. आंबेडकरांना पाठिंबा, पतितपावन मंदिराची स्थापना, अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन कार्य, ब्रिटिशांकडून बिनशर्त (Chinchwad) सुटका,एकसंध हिंदुस्थानचे स्वप्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट, 2 ऑगस्ट 1947 रोजी पुण्यात केलेले भाषण, भारताची फाळणी होऊ नये म्हणून एकट्या हिंदू महासभेचे प्रयत्न, 22 जून 1948 ला महाभियोगाची कारवाई आणि त्यावर 52 पानी निवेदन, 10 फेब्रुवारी 1949 रोजी निर्दोष मुक्तता, देशाच्या सीमांचे संरक्षण करावे म्हणून राष्ट्रपतींना पाठवलेले पत्र, भारतीय वक्तृत्वाचा महामेरू, आत्मार्पण अशा घटनांची मालिका अभिवाचनातून उलगडत गेली.

केशव घोळवे यांनी प्रास्ताविक केले. उमा खापरे यांनी, “देवधर्मासोबतच शिवशंभो फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे!” असे गौरवोद्गार काढले. रेणुका हजारे, सीमा साकोरे, संजय माने, विलास शिंदे, सुब्राव कुलकर्णी, काळुराम साकोरे, राजेश हजारे, मनोज साळुंखे यांनी संयोजनात सहकार्य केले. सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.