Chinchwad : ललित पाटीलचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन; 20 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात होता आरोपी

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयातून दोन ऑक्टोबर रोजी पळालेल्या अमली पदार्थांचा कुख्यात (Chinchwad) तस्कर ललित पाटील याने पुणे, मुंबई पोलिसांना जेरीस आणले. पुणे पोलिसांची दहा पथके त्याच्या मागावर होती. संपूर्ण पोलीस यंत्रणेला चकमा देऊन तो तब्बल 15 दिवस फिरत होता .शेवटी मुंबई पोलिसांनी त्याला 17 ऑक्टोबर रोजी चेन्नई मधून अटक केली.

 

त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी काहीसा निःश्वास सोडला खरा पण राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ललित पाटील हा मागील अनेक वर्षांपासून ड्रग्ज बनवणे, त्याचा विविध भागात पुरवठा करणे, विक्री करण्याचे काम करीत आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देखील ड्रग्जच्या एका मोठ्या प्रकरणात अटक केली होती.

Maval : तब्बल 78 दिवस अंड्यांची निगा राखत सापाच्या पाच पिलांना दिला जन्म

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे ड्रग्ज पकडले
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या (Chinchwad) हद्दीत 20 कोटी रुपये किमतीचे 20 किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते. तत्कालीन अंमली पदार्थ विरोधी पथकाला एमडी ड्रग्जची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा लाऊन एक कार पकडली. त्यामध्ये हे ड्रग्ज सापडले होते. ही कार रांजणगाव येथून मुंबईच्या दिशेने ड्रग्ज घेऊन जात होती. या प्रकरणात अनेकांना अटक करून याचे लांबपर्यंतचे धागेदोरे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उलगडले होते.

आरोपींमध्ये ललित पाटीलचाही सहभाग
या ड्रग्ज प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एका नायजेरियन व्यक्तीसह राज्याच्या विविध भागातील अनेक आरोपींना अटक केली होती. मुख्य सूत्रधार तुषार सुर्यकांत काळे, राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी, किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे, चेतन फक्कड दंडवते, आनंदगीर मधुगिर गोसावी, अक्षय शिवाजी काळे, संजिवकुमार बन्सी राऊत, तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम, परशुराम भालचंद्र जोगल, मंदार बळीराम भोसले, राम मनोहरलाल गुरबानी, अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे, मनोज एकनाथ पालांडे, अफजल हुसैन अब्बास सुणसरा, ललित पाटील, नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको या आरोपींना मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, उत्तर प्रदेश, गुजरात मधून अटक करण्यात आली होती.

ललित पाटील करायचा मांडवली
ललित पाटील याला नाशिक मधून अटक केली होती. त्याच्याकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तो ड्रग्ज प्रकरणात पार्टनर आणि वेगवेगळ्या लोकांना मॅनेज करण्याचे काम करत होता. आरोपींच्या बाजूने ड्रग्ज खरेदी करणाऱ्या ग्राहकांसोबत मांडवली करण्याचे काम ललित पाटील हा करत होता. या ड्रग्ज प्रकरणातील हा मुख्य धागा तपासात पोलिसांना मिळाला होता.

नायजेरियन व्यक्तीचा समावेश
त्यांच्यासोबत पोलिसांच्या हाती एक नायजेरियन व्यक्ती देखील आला. या नायजेरियन व्यक्तीचा देखील या प्रकरणात समावेश आहे. झुबी इफनेयी उडोको असे या नायजेरियन व्यक्तीचे नाव आहे. झुबी एका अमली पदार्थांच्या प्रकरणात कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा भोगून आला आहे. त्याने त्याच्या व्हिसामध्ये देखील छेडछाड केली होती. त्याबाबत त्याच्यावर स्वतंत्रपणे कारवाई करण्यात आली होती.

कुठे आणि कसे बनवले एमडी ड्रग्ज
आरोपी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी यांनी डिसेंबर 2019 मध्ये तुषार सुर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीत सुमारे 132 किलो एमडी ड्रग्ज बनवले होते. त्यातील 112 किलो एमडी ड्रग्ज हे तुषार काळे याने यापूर्वीच नेऊन त्याची बाजारात विक्री केली होती. राहिलेले 20 किलो ड्रग्ज हे अक्षय काळे याने त्याच्या घरी ठेवले होते. त्याची विक्री करण्यासाठी जात असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर सापळा लाऊन त्यांना अटक केली होती.

किरण काळे हा रांजणगाव एमआयडीसी मधील एका दुस-या कंपनीत संचालक म्हणून काम करत होत. त्याने यासाठी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. यासाठी किरण काळे याने त्याच्या कार्यालयात आरोपींसोबत मिटिंग घेऊन एक किलो ड्रग्ज बनवण्यासाठी 60 हजार रुपये असा दर ठरवला होता. तुषार काळे याने त्या बदल्यात एकूण 67 लाख रुपये दिले होते.

छोटा राजन गॅंगशी संबंध

आरोपी तुषार सुर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. त्याचा मुंबईतील कुख्यात छोटा राजन या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे. त्यातून त्याने अंमली पदार्थांच्या बाजारातील अनेकांशी ओळख केली होती. त्यामुळे त्याला रांजणगाव येथे बनवलेले ड्रग्ज अमली पदार्थांच्या बाजारात विकणे सोपे होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.