Chinchwad News : शंभूचरित्रातून कर्तव्यनिष्ठा शिकावी – अर्चना भोर – कारंडे

एमपीसी न्यूज – “स्वराज्यरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शंभूराजे यांच्या चरित्रातून कर्तव्यनिष्ठा शिकावी” असे प्रतिपादन युवाव्याख्यात्या अर्चना भोर – कारंडे (Chinchwad News ) यांनी केले.

शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे गुरुवारी (दि.16) महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशन आयोजित तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत ‘शिवपुत्र संभाजीराजे’ या विषयावरील द्वितीय पुष्प अर्चना भोर – कारंडे यांनी गुंफले.

उद्योजिका सिंधू बंडगर, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, उद्योजक महेंद्र पाटील, ज्ञानेश्वर नागरगोजे, अभिनेते अविनाश आवटे, सातारा मित्रमंडळाचे अध्यक्ष गोपीचंद जगताप, शिवशंभो फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तोरखडे उपस्थित होते.

Chinchwad Bye Election : नाना काटे यांच्या विजयासाठी कामाला लागा, पक्षविरोधी कृती सहन करणार नाही – सचिन अहिर

 

अर्चना भोर – कारंडे पुढे म्हणाल्या की, “अजूनही महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास पुरेशा प्रमाणात लिहिला गेला नाही. बालवयातच त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे जिजाऊ माँसाहेबांनी त्यांचे संगोपन केले. शंभूराजे केवळ दोन वर्षांचे असताना स्वराज्यावर अफजलखानाचे संकट चालून आले.

तेव्हा बाळ शंभू यांना गादीवर बसवून राज्य चालवू, असा निर्धार जिजाऊंनी छत्रपती शिवबांपाशी व्यक्त केला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिणाऱ्या शंभूराजांना वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत तेरा भाषा अवगत झाल्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारांनी त्यांना निर्भय व्यक्तिमत्त्व बहाल केले; तर छत्रपती शिवरायांपासून परस्त्री मातेसमान ही शिकवण त्यांना मिळाली.

एकपत्नीव्रत निष्ठेने पाळणाऱ्या शंभूराजांनी आपली धर्मपत्नी येसूबाई राणीसाहेब यांना राजकारणाचे धडे दिले. असे असूनही दुर्दैवाने त्यांचा खोटा अन् विकृत इतिहास रंगवला गेला. वाऱ्यापेक्षा चपळ अन् घोड्यापेक्षा गतिमान व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवपुत्र संभाजीराजे होय. औरंगजेबाने अमानुष अत्याचार करूनही त्याला शंभूराजे यांचा स्वाभिमान जिंकता आला नाही; तसेच त्यांच्या हौतात्म्यानंतरही मावळ्यांनी स्वराज्याच्या मातीचा कणही औरंगजेबाला मिळू दिला नाही.

त्यामुळे स्वराज्यासाठी कसे मरावे, हा वस्तुपाठ शंभूराजे यांनी इतिहासाला दिला!” अतिशय अभिनिवेशपूर्ण शैलीतून अर्चना भोर – कारंडे यांनी आग्रा दरबारातील प्रसंग, बुऱ्हाणपूर खजिना लूट, देसाईगढीचा लढा असे विविध दाखले देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गारदगर्जनेने त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. अरुणा घोळवे, सीमा साकोरे, रेणुका हजारे, कैलास पोखरकर, धनवरलाल शर्मा यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. संतोष रांजणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.