Chinchwad : फॉरेक्स ट्रेडिंग नको रे बाबा! शहरातून 30 कोटी रुपये फॉरेक्स ट्रेडिंगमधून विदेशात

एमपीसी न्यूज – फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फॉरेक्स ट्रेडिंग मार्फत विदेशी चलनात गुंतवणूक होते. अलीकडच्या काळात अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग कंपन्यांचे अचानक पेव फुटल्याने त्यामध्ये फसवणूक होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात फॉरेक्स ट्रेडिंगचे एक प्रकरण उघडकीस आले असून त्यात तब्बल 30 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम गुंतवली गेली आहे. हा आकडा आणखी खूप वाढण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

Talegaon : भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

जानेवारी 2022 मध्ये वाकड पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने फसवणुकीची फिर्याद दिली. त्यात बांधकाम व्यवसायिकासह 15 जणांची आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फॉरेक्स ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे म्हटले होते. तीन कोटींहून अधिकचा व्यवहार असल्याने हे प्रकरण पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास केला असता फसवणूक झालेल्यांची संख्या 122 एवढी झाली आहे. तर फसवणुकीची रक्कम 30 कोटी 79 लाख 75 हजार 56 रुपये एवढी झाली आहे.

इन्फीनॉक्स कॅपिटल शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनी असल्याचे भासवून त्याचे चार संचालक आहेत. त्यातील एकाने वाकड मधील बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क केला. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे त्याने अमिश दाखवले होते. मेटा ट्रेड फोर या अॅपवर आरोपींनी खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करून त्यावर गुंतवणूकदरांनी पैसे गुंतवल्यास विदेशी चलनात त्यात वाढ होत असल्याचे दाखविण्यात येत होते. आपण गुंतवणूक केलेले पैसे डिजिटल स्वरूपात वाढत असल्याचे दिसत असल्याने आणि त्यातून मोठा नफा देखील मिळत असल्यामुळे त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली.

दरम्यान, गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला असता ते पैसे मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना एक एजंट देखील असल्याचे निष्पन्न झाले. तो एजंट रावेत मधील घरी असताना पोलिसांनी त्याची तांत्रिक विश्लेषणातून माहिती काढली आणि मार्च 2022 मध्ये एजंटला अटक केली. इन्फीनॉक्स कॅपिटल शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीच्या एका संचालकाला देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मुंबईमधून अटक केली.

तपासासाठी एसआयटी
गुन्ह्यातील आरोपींची आर्थिक गुन्हे शाखेने माहिती काढली असता तिघेजण विदेशात असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस आयुक्तांनी यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांचा यामध्ये समावेश आहे.

या प्रकरणातील एक आरोपी गुजरातचा रहिवासी असून तो सध्या दुबई मधून हे सर्व घोटाळे ऑपरेट करत आहे. त्याला अटक करण्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारत सरकारच्या माध्यमातून इंटरपोलशी संपर्क केला आहे. इंटरपोल मार्फत संबंधित आरोपींची रेड कॉर्नर नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गुंतवणूकदरांचा पैसा हवाला मार्फत विदेशात
इन्फीनॉक्स कॅपिटल शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वेगवेगळे बँक खाते क्रमांक दिले जात. ही खाती संपूर्ण भारत देशातील आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 40 बँक खात्यांचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. गुंतवणूकदारांनी संबंधित बँक खात्यावर पैसे भरल्यानंतर ते पैसे काढून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

त्यामुळे या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या सर्व बँक खात्याचे व्यवहार तपासण्याचे काम सुरु आहे. फॉरेक्स ट्रेडिंग हे विदेशातून ऑपरेट केले जात असल्याने भारतीयांनी बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवलेले पैसे हवाला अथवा अंगडिया (कुरियर सर्व्हिस) मार्फत विदेशात गेल्याची शक्यता आहे. सध्या हवाला पेक्षा अंगडियाची चर्चा सर्वाधिक होत आहे.

आरबीआय सांगते जाणकार व्हा
विदेशी चलनात गुंतवणूक केली असल्याने विदेशी चलनाच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी झाल्यास फॉरेक्स ट्रेडिंग मधील गुंतवणूकदारांना जास्त नफा होतो. रात्रीत श्रीमंत होण्याचे अनेकांना स्वप्न पडते. त्यामुळे कुठलीही पडताळणी न करता गुंतवणूकदार विदेशी चलनात गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक डॉलर, पाऊंड, युरो, येन अशा विदेशी चलनात होते.

फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट 1999 (एफईएमए) अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ट्रेडिंग सोल्युशन देण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांच्यासोबत भारतीय नागरिकांना फॉरेक्स ट्रेडिंग अथवा फॉरेक्स ट्रॅन्जेक्शन करता येतील. त्याबाबत आरबीआयच्या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती अपडेट केली जात आहे. फॉरेक्स ट्रेडिंगवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जात आहे.

भारतात प्रतिबंधित असलेल्या फॉरेक्स ट्रेडिंग कंपन्या
अलपरी, एनी एफएक्स, अवा ट्रेड, बिनोमो, ई टोरो, एक्सनेस, एक्सपर्ट ऑप्शन, एफबीएस, फिन एफएक्स प्रो, फॉरेक्स डॉट कॉम, फॉरेक्स फोर मनी, फोक्सोरेक्स, एफटीएमओ, एफव्हीपी ट्रेड, एफएक्स प्रीमियम, एफएक्स स्ट्रीट, एफएक्ससीएम, एफएक्स नाईस, एफएक्सटीएम, हॉट फॉरेक्स, आयबेल मार्केट्स, आयसी मार्केट्स, आय फॉरेक्स, आयजी मार्केट्स, आयक्यू ऑप्शन, एनटीएस फॉरेक्स ट्रेडिंग, ऑक्टा एफएक्स, ऑलिम्प ट्रेड, टीडी अमेरीट्रेड, टीपी ग्लोबल एफएक्स, ट्रेड साईट एफएक्स, अर्बन फॉरेक्स, एक्सएम, एक्सटीबी, क्यूयूओटीईएक्स, एफएक्स वेस्टर्न, पॉकेट ऑप्शन, टिकमिल, कॅबाना कॅपिटल्स, वंटेज मार्केट्स, व्हीटी मार्केट्स, आयरॉन एफएक्स, इन्फिनॉक्स, बीडी स्वीस, एफपी मार्केट्स, मेटा ट्रेडर फोर, मेटा ट्रेडर फाईव्ह, पेपरस्टोन, क्यूएफएक्स मार्केट्स, 2 वीन ट्रेड, गुरु ट्रेड 7 लिमिटेड, ब्रिक ट्रेड, रुबिक ट्रेड, ड्रीम ट्रेड, मिनी ट्रेड, ट्रस्ट ट्रेड

भारतात परवानगी असलेल्या फॉरेक्स ट्रेडिंग कंपन्या
एफएक्स क्लिअर, एनडीएस कॉल, एनडीएस ओएम, क्रॉम्स, ट्रेप्स, अॅस्ट्रोइड, एफएक्स स्वॅप, आय स्ट्रीम, टेक्स/सेप, ३६०टीजीटीएक्स, एफएक्स ऑल, मॅचिंग, बीटीबीएस

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.