Chinchwad : क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या (Chinchwad) सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून चिंचवडगाव येथील गोशाळा प्रांगण, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मंगळवारी (दि.28) आयोजित करण्यात आलेल्या स्मारक समिती कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक यांच्या स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विश्व हिंदू परिषदेचे समरसता क्षेत्र प्रमुख गणेश मोकाशी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, ॲड. ललित झुनझुनवाला, संघाचे जिल्हाकार्यवाह माहेश्वर मराठे यांची व्यासपीठावर उपस्थिती होते, तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती वाडा विभागप्रमुख शरद जाधव, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, सचिन साठे, जागृती धर्माधिकारी, अनिल सौंदडे, कृष्णा भंडलकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एलिंग्लिंगर ऑटोमोटिव्ह कॉम्पोनन्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या (Chinchwad) वतीने सीएसआर फंडातून देण्यात आलेल्या 4 लाख 50 हजार फक्त मदतनिधीचा धनादेश स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी आणि संचालक अशोक पारखी यांनी सुपुर्द केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे यांनी 1 लाख रुपये, तर उदय देशपांडे रुपये 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी गिरीश प्रभुणे यांनी उपस्थितांना आगामी काळातील नियोजित उपक्रमांची माहिती देताना भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल असे सहा मजली भव्य संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. अखंड भारताचा तपशीलवार इतिहास, ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे बलिदान हे चित्र, शिल्प अन् डिजिटल माध्यमातून कायमस्वरूपी साकारले जाईल.

या संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार असून त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने तत्त्वत: मान्यता दिली असल्याचेही सांगितले. यासाठी समाजातील विविध घटकांनी केवळ आर्थिकच नव्हे; तर बौद्धिक, शारीरिक स्वरूपात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन प्रभुणे यांनी केले. हेमंत करकरे यांनी, “सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर ऐतिहासिक प्रकल्प उभे राहतात!” असा विश्वास व्यक्त करून सामाजिक चळवळीतील विविध संदर्भांचे दाखले दिले.

शाहीर आसराम कसबे यांनी स्वरचित स्वागतपद्य सादर केले. ॲड. सतीश गोरडे यांनी प्रास्ताविकात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या पन्नास वर्षांच्या कालावधीतील उपक्रमांचा आढावा घेतला. अतुल आडे, हर्षदा धुमाळ, सतीश अवचार, मारुती वाघमारे, संकेत राव, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शैक्षणिक संकुलातील शिक्षक, कर्मचारी आणि कार्यकर्ते यांनी संयोजनात परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. गतिराम भोईर यांनी आभार मानले. पसायदानाने स्नेह मेळाव्याची सांगता करण्यात आली.

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या विधानाचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.