Dapodi : सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; चौघांना अटक

दीड महिन्यांपूर्वी झाला होता रस्त्यावरून वाद

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या वादातून टोळक्‍याने दोघांवर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये सराईत गुन्हेगार असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेदहाच्या सुमारास दापोडतील पवारवस्ती येथे घडली.

सुनील विठ्ठल आरडे (वय 26, रा. नाईक चाळ बोपोडी) या सराईत गुन्हेगाराचा खून झाला आहे. तर त्याचा भाचा अनिकेत चांदणे (वय 16, रा. खडकी) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी अनिकेत याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी रोहित भीमराव मांजरेकर (वय 28), राजेश भीमराव मांजरेकर (वय 34), हृषीकेश हनुमंत धोत्रे (वय 25, तिघे रा. नाईकचाळ, बोपोडी) आणि संदीप मनोहर जाधव (वय 25, रा. हिंगणे, पुणे) यांना अटक केली आहे. तर, रवी मांजरेकर आणि त्याचे अन्य साथीदार सात ते आठजण फरार झाले आहेत.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आरडे आणि आरोपी रवी मांजरेकर यांचा घराजवळील रस्ता अडवल्याच्या कारणावरून वाद सुरु आहे. या कारणावरून दीड महिन्यांपूर्वी देखील त्यांच्यात वाद झाला होता. सोमवारी रात्री आरडे आणि मांजरेकर यांच्यात पुन्हा त्याच कारणावरून वाद पेटला. या वादानंतर आरडे याने त्याचा भाचा अनिकेत याला फोन करून बोलावले.

अनिकेत त्याच्या मित्रांना घेऊन त्या ठिकाणी आल्यानंतर दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आरडे जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी दगडाने ठेचून त्याचा खून केला. भोसरी पोलिसांनी यातील चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.