Dasara Melawa Live : मराठा आरक्षण हेच सरकार टिकवणार; आत्महत्या करू नका; एकनाथ शिंदे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज : आज विजयादशमी निमित्ताने (Dasara Melawa Live ) दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना पक्षाकडून मुंबईत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यापासून शिवसेनेच्या मेळाव्यातही फुट पडली अन मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे होऊ लागले आहेत. यंदाचे हे दुसरे वर्ष असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा आझाद मैदानात होत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थावर होणार आहे. दोन्ही नेते यंदा एकमेकांवर कोणत्या नव्या मुद्दयांवरून टीका करणार आहेत हे पाहणे औत्सुकतेचे ठरले आहे. 

मराठा आरक्षण हेच सरकार टिकवणार – एकनाथ शिंदे 

एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हंटले, की हे सरकार मराठा आरक्षण टिकवणार. मराठा, ओबीसी, धनगर अशा जातीत वाटून अनेकजण जातीचे राजकारण करत आहेत. पण माझी मराठा बांधवांना विनंती आहे, की कोणीही आत्महत्या करू नका, आपला संसार वाऱ्यावर सोडून जाऊ नका. कारण हे सरकार तुमचे आहे, कोर्टात टिकवणारे आरक्षण हेच सरकार देणार अशी ग्वाहीही मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेत युतीचे सरकार टिकेल असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सांगता केली.


मुंबई महाराष्ट्रापासून कोणाचाही बाप तोडू शकत नाही – एकनाथ शिंदे 

एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. हिंमत केली, सरकार आडवं करून मी इकडे येऊन बसलो. कारण उदय तुमच्यातला सामान्य कार्यकर्ता देखील मुख्यमंत्री झाला पाहिजे. माझी जनता माझ्या सोबत आहे तोवर मला पदाची लालसा नाही.

तुम्ही सतत मुंबई महाराष्ट्रापासून तोडली म्हणता मुंबई महाराष्ट्रापासून कोणाचाही बाप तोडू शकत नाही. जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोवर मुंबई महाराष्ट्राची राहणार. तिला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार. तुम्ही रस्ते, मेट्रो बंद केले. आम्ही मेट्रो सुरू केली, रस्ते सुधारले, कोस्टल रोड करतोय. मी दावोसमध्ये जातो आणि मुंबईच्या नाल्यामध्ये उतरतो, गरीबांच्या वसतीमधील शौचालयाची पाहणी देखील करतोय.

तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठ्या खाल्ल्या ते सांगा. तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती. बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यांनी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा.


उद्धव ठाकरे – मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न 

महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार. एका बिल्डरला पालकमंत्री केले. त्याचे ऑफिस मुंबई महापालिकेत दिले. अशा प्रकारे मुंबई बिल्डरांना देण्यासाठी प्रयत्न सुरू असून उद्धव ठाकरे यांनी मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य केले.

पंतप्रधान मोदी यांच्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले, की  मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये. मोदी सरकार गेलंच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेलं सरकार नको असे म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली.


शिंदे गट – आमच्याकडे 50 कोटींची मागणी केली – शिंदेंचा ठाकरे गटावर आरोप 

एकनाथ शिंदे यंदाच्या मेळाव्यात हळूहळू ठाकरे गटाच्या आरोपाना प्रतिउत्तर देताना काही खुलासे करत आहेत. यातच त्यांनी 50 खोक्यांवर उत्तर देताना म्हंटले, की जेव्हा आयोगाने यांचे पक्ष आणि चिन्ह गोठवले त्यावेळी यांनी बँकेकडे 50 कोटी मागितले. बँकेने नकार दिल्यावर यांनी आमच्याकडे 50 कोटींची मागणी केली. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी कोणताही विचार न करता त्यांना पैसे दिले.


शिंदे गट – ज्यांना बाळासाहेबांनी आपल्याजवळही उभं केलं नाही त्यांच्या सोबत आज हे उभे आहेत – एकनाथ शिंदे 

आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणालाही सुरुवात झाली आहे. शिंदे म्हणाले, की आझाद मैदानाला देखील इतिहास आहे. अशा आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पहाटेपासून लोक आले आहेत. पुढे उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या डिवचण्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, की आम्ही सत्ता हिंदुत्वासाठी सोडली. आणि हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. ज्यांना बाळासाहेबांनी आपल्याजवळही उभं केलं नाही त्यांच्या सोबत आज हे उभे आहेत. आणि हे आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणतात. हे स्वत: एक फुल एक हाफ असून कधीही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील.


ठाकरे गट – तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे – उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली असून त्यांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांविरोधात तडफदार भाषणाला सुरुवात केली आहे.. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, की रावण हा शिवभक्त होता. तरीही श्रीरामाला त्याला मारावं लागले. वध करावे लागले. कारण तो माजला होता. ज्याप्रमाणे हनुमानाने सोन्याची लंका दहन केली तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे.

उद्धव ठाकरे – 57 वर्ष झाले पण आपण आपली परंपरा चालूच ठेवली आहे. काही लोकांनी ही परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आपण मोडू दिला नाही.


ठाकरे गट – कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नसून सगळ्यांना भाजपात सामील करणार – संजय राऊत 

प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ईडीच्या नोटीस दिल्या म्हणून ते भाजपासोबत आहेत. कोणाला उलट लटकवणार? भाजप कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नसून सगळ्यांना भाजपात सामील करणार असल्याचे संजय राऊत यांनी भाषणातून सांगितले. इकडे शिवतीर्थावर मराठा तितुका मेळवावा सुरू असून आझाद मैदानावर मराठा तितुका लोळवावा सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.


शिंदे गट – मग आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार? – गुलाबराव पाटील 

गेली 37-38 वर्षापासून गावामध्ये दसरा कसा होतो हे आम्ही कधी पाहिले नाही. सुलभ शौचालयात आंघोळ करून  मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी चार वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा पकडायची, असे आम्ही कार्यकर्ते आणि आज आम्हाला बरेच लोक गद्दार म्हणत आहेत. आम्ही गद्दार आहोत तर मग मग आमच्यासोबत लव्ह मॅरेज करणाऱ्या अजित पवारांना काय म्हणणार? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.


ठाकरे गट –  सत्तेत तुम्ही राहणार नाही – भास्कर जाधव 

भास्कर जाधव यांनी पक्ष फोडीवर निशाणा साधत भाजपवर हल्लाबोल करताना म्हटले की  मागच्या दोन निवडणुकीत शिवसेना तुमच्यासोबत होती. आता तुमच्यासोबत नाही. त्यामुळे आता सत्तेत तुम्हीही राहणार नाही.

शिंदे गट – अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो – ज्योती वाघमारे 

शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हंटले, की तिकडे जमले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आज 57 वर्षांची परंपरा असलेल्या मेळाव्याच्या मंचावरून विचारते मर्द कोणाला म्हणायचे? कोरोना काळात घरात बसणारा की पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेणारा? अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात जाणारा मर्द नसतो, रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा मर्द असतो.


ठाकरे गट – सुषमा अंधारे यांचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर –

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करताना म्हंटले, की शिस्तीत राहायचे, धमक्या देण्याचे काम नाही, मी चळवळीतून आली आहे, धमक्यांना घाबरत नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.