Pimpri : चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट सुरु होणे ही त्यांना खरी आदरांजली – सुमित्रा महाजन

क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट सुरु होणे ही केवळ उत्सवाची बाब नाही. तर टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. त्यांचा इतिहास यानिमित्ताने संपूर्ण देशभरात वारंवार पोहोचणार आहे. असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी  व्यक्त केले.

चिंचवड मधील क्रांतिवीर चापेकर वाड्यात सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते टपाल तिकीट अनावरण सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे, विलास लांडगे, विनायक थोरात, मुकुंद कुलकर्णी, गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक माऊली थोरात, अॅड. सचिन भोसले, नारायण बहिरवाडे आदी उपस्थित होते.

सुमित्रा महाजन म्हणाल्या, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना क्रांतिवीर चापेकरांचे चित्र सेंट्रल सभागृहात लावण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात क्रांतिवीर चापेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिट सुरु  आले. ही त्यांच्याप्रती सरकारने व्यक्त केलेली खरी कृतज्ञता आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांप्रती आपण कृतज्ञ असायला हवे. आपला इतिहास वेळोवेळी आपल्या स्मृतीत असायला हवा. देशाप्रती आणि देशवीरांप्रती आदराची भावना असायला हवी. राष्ट्रभक्ती आणि कामाची निष्ठा यातून अनेक गोष्टी साकार होतात. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे कामाची निष्ठा आहे. ते लोकसभेत आग्रहाने प्रश्न विचारतात. प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रश्न मांडल्यानंतर तो तडीस नेण्यासाठी वारंवार पाठपुरावा करतात. अशी कामे कुणाकडूनही होत नाहीत. कारण ‘तिथे पाहिजे राष्ट्रभक्तीचे माप’ असे गौरवोद्गार काढत त्यांनी खासदार बारणे यांच्या कामाची स्तुती केली.

सध्या पोस्टल खात्याला मृतावस्था आली आहे. कारण आपण पत्र लिहायला विसरलो आहोत. आपल्या जवळच्या माणसांना बोलायला आपल्याला वेळ नाही आणि शेकडो मैल दूर असणा-या अज्ञात मित्रांना आपण धन्यता मानू लागलो, त्यामुळे ही अवस्था झाली आहे. आपल्या लोकांसोबतच संवाद हरवत चालला आहे. तो पुन्हा पूर्ववत होणे आवश्यक आहे. आपण आपल्या माणसांना आपल्या मनातल्या गोष्टी लिहिल्या तर मन मोकळे होते. मन मोकळे होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.

खासदार बारणे म्हणाले, क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्याबाबत मी गेली तीन वर्ष पाठपुरावा करत होतो. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. संसदेतील पाठपुराव्यासाठी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. गिरीश प्रभुणे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. केंद्र सरकारने  दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली. आज त्या सर्व पाठपुराव्याचे चीज झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

गिरीश बापट म्हणाले, देशाच्या इतिहासात चापेकर अजरामर आहेत. जेंव्हा जेंव्हा आपण चापेकरांचे तिकीट दिसेल तेंव्हा तेंव्हा त्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येईल. अनेकजण राजकीय तिकिटांच्या मागे असतात. पण अशा इतिहासाची आठवण करून देणा-या टपाल तिकिटांच्या मागे फार कमीजण असतात. त्यातील एक खासदार बारणे आहेत. देशासाठी बलिदान देणा-या शहिदांना अशा प्रकारच्या उपक्रमांमधून आदरांजली वाहता येईल. आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले, ते तुम्ही आता चांगल्या प्रकारे टिकवून ठेवा, ही भावना प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांकडे बघून मनात येते. चापेकर स्मारक समितीचे काम देखील वाखाणण्याजोगे आहे, असेही गिरीश बापट म्हणाले.

केंद्रीय मंत्री हंसराज अहिर म्हणाले, क्रांतिवीर चापेकर यांच्यावरील पोस्टाचे तिकीट वेळेअभावी सभापती सुमित्रा महाजन यांच्या कक्षात करण्याचे ठरले होते. मात्र क्रांतिवीरांच्या भूमीत जाऊन त्यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण करावे, अशी भूमिका सभापती सुमित्रा महाजन यांनी मांडली. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा चापेकरांच्या भूमीत येण्याचा योग आला. पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत होऊन गेले आहेत. त्यांचे स्मरण यानिमित्ताने होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.