Hinjawadi News : पोलिसांना ओळखता येऊ नये म्हणून आरोपीने रिक्षाचा मेक ओव्हर बदलला; तरीही पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानंतर रिक्षा चालकाने पोलिसांना ओळखता येऊ नये म्हणून रिक्षाचा मेक ओव्हर बदलला. पण आरोपीच्या पुढे एक पाऊल टाकत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

सचिन देविदास शेंडगे (वय 33, कॉलनी नंबर दोन, किनारा हॉटेल जवळ, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

एका व्यक्तीने 22 एप्रिल रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 22 एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी यांची 12 वर्षीय मुलगी क्लासवरून घरी जात असताना एलएमडी चौक बावधन येथे एक रिक्षा चालक आला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाने पीडित मुलीजवळ रिक्षा थांबवली. त्यानंतर अश्लील वर्तन करत त्याने पीडित मुलीचा विनयभंग केला. मुलगी घाबरून घरी आली आणि तिने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ अधिका-यांनी हिंजवडी पोलिसांची दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात अस्पष्ट रिक्षा नंबर दिसला. त्यावरून पोलिसांनी मिळत्याजुळत्या रिक्षा क्रमांकाची पडताळणी केली. त्यानंतर आरोपीच्या वर्णनावरून देखील चौकशी सुरु केली. दापोडी येथे एम एच 12 / क्यू आर 6105 या क्रमांकाच्या रिक्षा चालकाच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. त्यात आरोपीचे वर्णन जुळत होते, मात्र रिक्षाचे वर्णन पोलिसांना जुळत नव्हते.

त्यानंतर पोलिसांनी रिक्षाबाबत अधिक माहिती काढली. त्यात रिक्षा चालकाने नुकताच मेक ओव्हर केल्याचे समोर आले. त्यानंतर सोमवारी (दि. 25) संबंधित रिक्षा चालक मानकर चौक वाकड येथे येणार असल्याची हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून सचिन शेंडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच पोलिसांना ओळखता येऊ नये म्हणून रिक्षाचा मेक ओव्हर बदलला असल्याचेही सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, सहाय्यक फौजदार महेश वायबसे, बंडु मारणे, पोलीस अंमलदार कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव महिला पोलीस नाईक नुतन कोंडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.