Pimpri News : कंपनीतील अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुधवारी कामगारांचे पिंपरीत उपोषण

एमपीसी न्यूज – कामगार संघटनेचे सदस्यत्व  स्वीकारुन युनियन केल्याचा राग आल्याने कामगारांना मारहाण करणा-या, जीवे मारण्याची धमकी देणा-या चाकण (Pimpri News) येथील एका कंपनीतील अधिकारी, कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा, कामगारांना त्यांच्या कर्तव्यावर कायदेशीर पद्धतीने कंपनीच्या हजेरी पत्रकावर कायम करुन घ्यावे, या मागण्यांकरिता सुमारे 123 कामगार बुधवार (दि.23) पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे सर्व कामगार उद्यापासून उपोषणला करणार आहेत. चाकण, खराबवाडीतील थेट उत्पादन प्रक्रियेत काम करत असलेल्या एका कंपनीत हे कामगार  गेली अनेक वर्ष काम करत आहेत. कायदेशीररित्या कंपनीत 240 दिवस नोकरी केल्यानंतर त्या कामगारांना कंपनी सेवेत कायम करायला पाहिजे. परंतु, तसे न करता या कामगारांना 2 वर्षे ट्रेनी ठेवण्यात आले. त्यानंतर बेकायदेशीरपणे कंत्राटी पद्धतीने ठेवले.

कामगारांना कायदेशीर वेतन, सुट्या देखील मिळत नव्हत्या. कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. याबाबत संघटनेने अप्पर कामगार आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळविले. कंपनीला हे पत्र मिळताच प्लांट हेड, एचआर, प्रोडक्शन मॅनेजर, डीसपॅच मॅनेजर आणि कंत्राटदाराने ड्युटीवर असलेल्या कामगारांना बोलावून घेतले. ‘युनियनचा राजीनामा द्या, नाही तर आम्ही प्रत्येकाला मारु’, ‘पोलीस स्टेशन आमच्या ताब्यात आहे’, ‘आम्ही तुमच्या विरोधात खोट्या तक्रारी देवून तुम्हाला  तुरुंगात डांबु’ अशी धमकी दिल्याचा आरोप कामगारांनी केला.

Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात! दोन वाहनांचं नुकसान

राकेश कुमार ठाकूर या कामगाराला 10 ऑक्टोबर 2022 रोजी प्लांट हेडने केबिनमध्ये बोलावून घेतले. संघटना सोडण्यासाठी दबाव आणला, जीवे मारण्याची धमकी दिली.(Pimpri News) तर, ठेकेदाराने या कामगाराला मारहाण केली. युनियन कोणी केली, याची विचारणा करुन कामगारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण झालेल्या कामगाराने म्हाळूंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी लेखी अर्ज दिला. वारंवार पोलिसांकडे जावूनही तक्रार दाखल करुन घेतली नाही. कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप कामगारांनी केला.

या कामगारांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस आयुक्तांचीही समक्ष भेट घेतली. मारहाण झालेल्या कामगाराने सर्व घटनाक्रम आयुक्तांना सांगितला. त्यावर ‘तुमची तक्रार दाखल करुन घेतली जाईल. तसे म्हाळूंगे पोलीस स्टेशनला मी निर्देश देतो’, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. (Pimpri News) परंतु, अद्यापर्यंत तक्रार दाखल करुन घेतली नसल्याचे कामगारांनी सांगितले. या कामगारांना न्याय मिळावा, मारहाण करणा-या व जीवे मारण्याची धमकी देणा-या अधिकारी व ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. गेली दोन महिन्यापासून कामावर येण्यास मनाई केलेल्या कामगारांना सेवेत कायम करुन कामावर घ्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामगार उद्या (बुधवार) पासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे कार्यालयीन सचिव करण भालेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.