Indrayani Ghat : सोशल मीडिया ग्रुपची दखल घेत अग्निशमन दल, पालिका कर्मचाऱ्यांमार्फत इंद्रायणी घाट स्वच्छ

एमपीसी न्यूज : छट पूजेवेळी व लक्ष दिप कार्यक्रमावेळी (Indrayani Ghat) इंद्रायणी घाटावरील लावण्यात आलेल्या पणत्यांच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात तेलकटपणा निर्माण झालेला होता. तसेच, या कार्यक्रमानंतर पणत्यांमधील तेलकट वाती तश्याच घाटावरती पडल्या होत्या. त्यामुळे तेथील भाग ठिक ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तेलकट झाल्याने घाटावरती नागरिकांना बसण्यासाठी असुविधा होत होती.

कार्तिकी यात्रेत पवित्र इंद्रायणी नदीत स्नानासाठी मोठ्या प्रमाणात घाटावरती गर्दी होत असते. घाटावरती त्या कार्यक्रमानंतर झालेल्या तेलकटपणामुळे येथील भाग निसरडा झालेला होता. त्यामुळे त्या दगडी घाटावरती दुर्घटनेची शक्यता घडू शकते.

 

याबाबत आळंदी जनहित युवा मंच या सोशल मीडिया ग्रुपवर (Indrayani Ghat) हेमकांत आल्हाट व आरिफ शेख यांनी मत व्यक्त केली होती. तसेच आरिफ शेख यांनी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना घाटावरील परिस्थिती ची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

याची दखल मुख्याधिकारी यांनी तत्काळ घेतली. तो परिसर स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिले.  अग्निशमन दलाच्या गाडीमधील पाण्याच्या पाईपद्वारे पाण्याच्या मोठ्या दाबाने तेथील परिसर स्वच्छ करण्याचे काम अग्निशमन दल व पालिका कर्मचारी करत असताना दिसून येत होते. तेथील स्वच्छता कार्य चालू झाल्याचे वृत्त कळताच आळंदी जनहित युवा मंचच्या वतीने आळंदी नगरपालिकेचे आभार मानण्यात आले.

 

नदी स्वच्छतेसाठी इंद्रायणी नगरमध्ये इंद्रायणी नदीकाठी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांच्या तर्फे नदी स्वच्छतेबाबत समाज प्रबोधनार्थ सहा नवीन फलक लावण्यात आले आहेत. त्यांनी त्या फलकामध्ये पालिके मार्फत नागरिकांना नम्र आवाहन केले आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवा. नदीमध्ये जुने कपडे, प्लास्टिक, हार, फुले व इतर कचरा टाकू नये. सर्वांनी इंद्रायणी मातेचे पावित्र्य राखा. नद्यांसोबत आईसारखे आचरण करा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.