Kalewadi: ‘उत्पन्न मिळत नाही, म्हणून सुविधा देत नाही’, आयुक्तांचे अजब उत्तर

नगरसेवकांनी केला आयुक्तांचा निषेध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला काळेवाडी परिसरातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काळेवाडी परिसरात महापालिकेमार्फत सुविधा दिल्या जात नाहीत असे अजब उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे. असे बोलणे चुकीचे असून आयएएस अधिका-याला हे शोभते का? असा खडा सवाल अपक्ष नगरसेविका नीता पाडाळे यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी आयुक्तांचा महासभेत जाहीर निषेध केला.

महासभेत बोलताना नीता पाडाळे म्हणाल्या, “काळेवाडी परिसरातून महापालिकेला उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे काळेवाडीत सुविधा देत नाही, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. मग, चिखली, च-होली परिसरातून किती निधी येतो. त्यामुळे त्या परिसरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरु आहेत का ? आयुक्तांनी असे बोलणे अतिशय चुकीचे आहे. आयएएस अधिका-याला हे शोभते का ?” असा सवाल करत आयुक्तांचा त्यांनी निषेध केला. अधिका-यांकडून ‘चिरिमिरी’ साठी फाईल अडविल्या जातात. नळ कनेक्शन, कराची नोंदणी देखील पैसे घेतल्याशिवाय अधिका-यांकडून केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे म्हणाले, “काळेवाडीतून उत्पन्न कमी मिळते. त्यामुळे सुविधा देत नाही, असे आयुक्त कसे बोलू शकतात. आयुक्तांच्या या बोलण्याचा खेद वाटतो. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.