Lonavala : घरोघरी ज्येष्ठा गौरींचे आगमन

एमपीसी न्यूज- विघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ आज घरोघरी मोठ्या भक्तीमय वातावरणात ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले.

गौरी पूजनाकरिता ग्रामीण भागात आज सकाळपासूनच महिलांची धावपळ सुरु होती. उत्साह व आनंदमय वातावरणात महिलांनी गौरीची रानफुले, वेण्या फण्या नदी व खाणींवर घेऊन जात त्यांना स्वच्छ धुवत त्यांची टोपलीमध्ये आकर्षक मांडणी करत वाजतगाजत घरी आणल्या. घरात विधीवत पूजन करुन दुपारनंतर घरोघरी गौरीमाता विराजमान झाल्या. देवीच्या प्रसादाकरिता विविध प्रकारच्या भाज्या, मिठाई, फराळ घरोघरी तयार करण्यात आले होते. आकर्षक सजावट केल्याने देवीचे मनमोहक रुप लक्षवेधी ठरत होते.

घरगुती गणपती हे पाच दिवसांचे तर गौरीचा सहवास तीन दिवसांचा असल्याने ग्रामीण भागात घरगुती बाप्पा व गौरी यांच्या पूजनाची जय्यत तयारी पहायला मिळत आहे. महिला वर्ग दिवसभर गौरी मातेच्या आगमनाच्या तयारीत दंग झाल्या होत्या. सण उत्सवात लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गावांमध्ये घरोघरी सामुहिक आरती व भजनांची नवीन परंपरा जोर धरु लागली असल्याने उत्सवात खर्‍या अर्थाने सामुहिकतेची भावना रुजु लागली असल्याचे पहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.