Lonavala : लोणावळा शहरातील कचरानिर्मितीमध्ये निम्म्याने घट

एमपीसी न्यूज : लाॅकडाऊनमुळे लोणावळा शहरातील हाॅटेल, खाद्य व्यावसाय व दुकाने बंद असल्याने शहरातील कचरानिर्मितीमध्ये निम्म्याने घट झाली आहे. लाॅकडाऊनआधी दैनंदिन सरासरी 44 टन कचरा शहरात निर्माण होत होता.  ते प्रमाण आता 17 ते 18 टन झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. लाॅकडाऊनमुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना शहरात कचरानिर्मितीमध्ये सकारात्मक परिणाम दिसत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात गत 35 दिवसांपासून लाॅकडाऊन सुरु आहे. लोणावळा शहरातील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व लहान मोठे हाॅटेल, चिक्की व कपड्यांची दुकाने तसेच इतर लहान मोठे व्यावसाय बंद असल्याने कचरा निर्मिती घटली आहे. 39 चौरस किमी अंतरात पसरलेल्या लोणावळा शहराच्या 12 प्रभागांमधून लाॅकडाऊनपुर्वी सरासरी 44 टन कचरा संकलित केला जायचा, हे प्रमाण आता घटले आहे.

नगरपरिषद ठेकेदाराच्या मार्फत हा कचरा गोळा करून वरसोली येथिल कचरा डेपोवर खत निर्मिती व बायोगॅस निर्मिती करिता घेऊन जाते. कचरानिर्मिती घटल्याने कचरा गोळा करणार्‍या ठेकेदाराला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कचरा डेपोवर कचरा विलगीकरणाचे काम करणारे कामगार यांना देखिल याचा फटका बसला असला तरी शहरातील कचरा निम्म्याने कमी झाला ही समाधानाची बाब आहे. लाॅकडाऊनमुळे वाहनांची संख्या घटल्याने शहरातील प्रदुषण कमी झाले आहे.

पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात हाॅटेलांची संख्या जास्त आहे. हाॅटेल व्यावसाय सध्या बंद असल्याने याठिकाणी निर्माण होणारा ओला कचरा कमी झाला आहे तसेच प्लास्टिकचे प्रमाण देखिल घटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.