Chinchwad : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चिंचवडमध्ये!

एमपीसी न्यूज – राज्याच्या औद्योगिक क्रांती व आर्थिक विकासात पिंपरी- चिंचवडचे मोलाचे स्थान पाहता शहरात (Chinchwad) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून नवउद्योजकांना उद्योग व्यवसायातील विविध संधी, नोंदण्या, परवाने, शासकीय कर्ज योजना आदींची माहिती केंद्रामार्फत देण्यात येणार आहे. नव्याने उद्योग- व्यवसाय करु इच्छिणाऱ्या नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ही उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून राज्यात उद्योजकतेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा या उद्देश्याने सन 1988 मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात संस्थेला कार्यालय, प्रशिक्षण घेण्याकरिता मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सामान्य नागरीकांना उद्योजकीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळावा याकरिता संस्थेमार्फत विविध प्रकारचे निशुल्क तसेच सशुल्क प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात.

मागील गेली 35 वर्षांपासून जवळपास 16 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी संस्थेमार्फत लाभ घेतलेला आहे. प्रशिक्षण तसेच (Chinchwad) प्रशिक्षणोत्तर नव्याने उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी एमसीईडी मदतीचा हात देते आणि प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय सुरु होण्याकरिता आवश्यक मार्गदर्शन करते. नवउद्योजकांना शासकीय कर्ज योजना, अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम केंद्रामार्फत राबविण्यात येतो.

अधिक माहितीसाठी पिंपरी-चिंचवड भागातील इच्छुक नागरिकांनी गेट क्र. 2, ऑटो- क्लस्टर आवार, सी-181, एच ब्लॉक, चिंचवड येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.