PCMC : शहरातील रस्त्यांची 15 ऑगस्टपासून यांत्रिकी पद्धतीने साफसफाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते आणि मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाईला 15 ऑगस्टपासून सुरूवात करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या कामाची निविदा ही सात वर्षांची असून चार वेगवेगळ्या ठेकेदारांकडून काम करुन घेण्यात येणार आहेत. सात वर्षांसाठी 348 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. इंधन दरात वाढ झाल्यास महापालिका वाढीव रक्कम ठेकेदारांना अदा करणार आहे.

Pune : पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे होणार फुल, पावसाचा जोर मात्र ओसरला

महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रीयेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना दिले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर 2020 मध्ये शहरातील 18 मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामकाजासाठी पॅकेज निहाय दर मागविण्यात आले होते. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. चार पॅकेजमध्ये ही निविदा होती.

दक्षिण भागासाठी 331 किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी 339.15 किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागाचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी विविध प्रकारचे प्रत्येकी 16 रोड स्वीपर व 16 इतर वाहने आणि 55 कर्मचारी असणार आहेत. 16 रोड स्वीपरच्या मार्फत प्रत्येकी 40 किलो मीटर रस्ते साफ केले जाणार आहेत.

यांत्रिकी पध्दतीने रस्ते सफाईची निविदा जुलै 2022 मध्ये राबविली होती. एक वर्ष झाले तरी प्रत्यक्षात कामकाज सुरू झालेले नाही. जूनमध्ये पालिकेने चार एजन्सीला वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र, रोड स्वीपर हे जर्मनी आणि इटली येथून आणले आहेत. त्यानंतर कस्टम आणि आरटीओची प्रक्रिया पार पडण्यास वेळ लागत आहे.

या संदर्भात 3 जुलैला चारही एजन्सीबरोबर बैठक झाली असून लवकरात-लवकर कामकाज सुरू करण्याच्या सुचना पालिकेने दिल्या आहेत. आता 15 ऑगस्टचा मुहूर्त दिला असताना या मुहूर्तावर तरी प्रत्यक्षात यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफ-सफाईला सुरूवात होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते आणि मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येणार आहे. चार एजन्सीला काम देण्यात आले असून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्षात कामकाज सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तशा सूचना संबंधित एजन्सीला दिल्या असल्याचे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.